महापालिकेची विक्रमी कामगिरी! अमरमहाल ते परळ जलबोगदा कामामध्ये एका महिन्यात तब्बल ५२६ मीटर खणन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्याने भूमिगत जल बोगद्यांच्या खणन कामात नवीन उच्चांक नोंदवला आहे. एका महिन्यात ५२६ मीटर खणन तर एकाच दिवसात ४० मीटरपेक्षा अधिक खणन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोन वेळा करण्याची किमया महानगरपालिकेने साध्य केली आहे. किनारी रस्ता प्रकल्पाने भूमिगत बोगदा खणन करण्याची विक्रमी कामगिरी नुकतीच साध्य केल्यानंतर त्यापाठोपाठ पाणीपुरवठा प्रकल्प खात्याने ही कामगिरी केल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी कौशल्याची सर्वत्र वाखाणणी केली जात आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्याच्या वतीने पूर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी दोन भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत. अमरमहाल ते परळ हा सुमारे ९.६८ किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगदा एफ/उत्तर आणि एफ/दक्षिण विभागांमध्ये तसेच ई आणि एल विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यास मदत करणार आहे. तर अमरमहाल ते ट्रॉम्बे उच्च पातळी जलाशयापर्यंत जाणारा दुसरा बोगदा हा सुमारे ५.५२ किलोमीटर लांबीचा असून त्याद्वारे एम/पूर्व आणि एम/पश्चिम विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यास मदत होणार आहे.

हे दोन्ही बोगदे जमिनीखाली सुमारे १०० ते ११० मीटर खोलीवर बांधण्यात येत असून त्यांचा व्यास ३.२ मीटर इतका आहे. या दोन्ही बोगद्यांमधून येणाऱया भूमिगत जलवाहिन्या ह्या भूपृष्ठावरील मुख्य जलवाहिनी आणि सेवा जलाशय यांना जोडल्या जाणार आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर स्थित दोन मुख्य जलवाहिन्यांमधून येणारे पाणी या बोगद्यांद्वारे पुढे जाणार आहे.

या भूमिगत जलबोगद्यांसाठी ‘टेराटेक’ कंपनीचे बोगदा खणन संयंत्र कार्यान्वित आहे. या संयंत्राने नुकतीच विक्रमी कामगिरी साध्य केली आहे. अमरमहाल ते परळ या पहिल्या भूमिगत जलद बोगद्याच्या कामामध्ये डिसेंबर २०२१ या एकाच महिन्यात तब्बल ५२६ मीटर खणन पूर्ण करण्यात आले आहे. बोगद्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या ८५ दिवसांच्या कालावधीत सुमारे एक किलोमीटरचे खणन पूर्ण करण्याची कामगिरी यामुळे साध्य झाली आहे. ही कामगिरी अपूर्व स्वरूपाची मानली जात असून त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञांकडून महानगरपालिकेचे कौतुक केले जात आहे.

एवढेच नव्हे तर अमरमहाल ते ट्रॉम्बे या दुसऱया बोगद्याच्या खणन कामामध्ये एकाच दिवशी ४०.३ मीटर खणन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोन वेळा साध्य करण्यात आली आहे. ही देखील अपूर्व कामगिरी मानली जात आहे. या दुसऱया बोगद्याचे एकूण २.७५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. म्हणजेच त्याचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.

अमरमहाल ते ट्रॉम्बे या भूमिगत जल बोगदा प्रकल्प अंतर्गत बोगदा खणन संयंत्र (टीबीएम) च्या सहाय्याने खणन कामाची सुरुवात दिनांक ६ मार्च २०२१ रोजी राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली होती. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही जलबोगद्यांची कामे वेगाने सुरु असून कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती असतांना देखील या दोन्ही बोगद्यांच्या कामांमध्ये प्रशासनाने खंड पडू दिलेला नाही. त्यामुळे हे दोन्ही भूमिगत जलबोगदे ठरलेल्या मुदतीत म्हणजे अनुक्रमे सन २०२६ आणि २०२४ मध्ये पूर्णत्वास जातील. एवढेच नव्हे तर चेंबूर ते वडाळा या अंतराचा अंशतः बोगदा सन २०२५ मध्ये सुरू होऊ शकेल.

या दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर, १०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचे भूमिगत पाणीपुरवठा बोगदे असणारे मुंबई हे जगातले दुसरे शहर ठरणार आहे. सद्यस्थितीत फक्त न्यूयॉर्क शहरातच १०० किलोमीटर पेक्षा अधिक अंतराचे भूमिगत जलबोगदे आहेत.


हेही वाचा :Corona Vaccination : मुंबई महापालिकेकडून १५ ते १८ वयोगटातील १ लाख मुलांचे लसीकरण