जिंदाल पॉलिमर कंपनीतील दुर्घटनेस कंपनी प्रशासन जबाबदार, अंबादास दानवेंचा आरोप

इगतपुरी – नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील जिंदाल पॉलिमर कंपनीतील दुर्घटनेस कंपनी प्रशासनच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील जिंदाल पॉलिमर कंपनीतील दुर्घटना स्थळाची पाहणी केली.
तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी जिंदाल कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. तसेच या प्रकरणात ३ कामगारांचा नाहक बळी गेला आहे. त्यामुळे पोलीस तपासात जे दोषी आढळतील त्यानुसार कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी देखील केली.

कंपनीने पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले असून प्रदुषण नियंत्रण मंडळाने यावर कारवाई करावी. ३ कामगारांचा नाहक बळी गेल्याप्रकरणी विधिमंडळात यावर प्रश्न उपस्थित करणार असल्याचे दानवे म्हणाले.

सदर कंपनीचे रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी शेतामधील विहिरीद्वारे धरणाच्या पात्रात जाते, यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याची तक्रार पत्रकारांनी केली असता, त्यावर दानवे म्हणाले की, याबाबत प्रशासनाचा कंपनी व्यवस्थापनावर वचक असला पाहिजे. छोट्या उद्योजकांवरच वचक न ठेवता प्रशासनाने दोषी असलेल्या मोठया उद्योजकांवर कायद्याचा धाक दाखवला पाहिजे.

यावेळी माजी आमदार निर्मला ताई गावित,उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव,महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर,तालुकाप्रमुख राजेंद्र ताठे,सरपंच विनायक गतीर,उपसरपंच हितेश अंबिर,तहसिलदार प्रमेश्वर कासोळे,जिंदाल कंपनीचे संजु सक्सेना,हेमंत जाधव व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.


हेही वाचा : २०२४ च्या निवडणुकीनंतर तुमच्यासोबत किंचित सेना असेल, बावनकुळेंचा ठाकरेंना टोला