जालन्यातील अंतवाली सराटी गावात आंदोलनाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या लाठीमारात काही जण जखमी झाले आहेत. त्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. तसंच, दीड वर्षांत चालवलेल्या विविध लाठ्यांचा हिशोब ठेवला जाणार आणि या सरकारला नागरिक योग्य ती जागा दाखवणार, असं म्हणत दानवे यांनी सरकारला इशारा दिला आहे. (Ambadas Danve has warned the government saying that the various lathicharge on Barasu Varakari And now in Jalna will never forget)
गेल्या वर्षभरात सरकारनं केलं काय?
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करत विद्यमान सरकारला इशारा दिला आहे. मागच्या वर्षभरापासून राज्यात शिंदे सरकार आहे. या शिंदे सरकारने आतापर्यंत बारसूमध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार केला. तर आळंदीतही वारकरी बांधवांवर लाठीमार करण्यात आला होता. आता जालन्यात शांततेनं आंदोलन करणाऱ्या मराठा बंधू भगिनींवर लाठीमार केला गेला. त्यामुळे आता खोके सरकारच्या एक एक काठीचा हिशेब ठेवला जाईल. याचे उत्तर मतपेटीतून व्याजासकट महाराष्ट्रातील आणि देशातील विद्यमान सत्ताधाऱ्यांना नक्की मिळेल, असं म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
गेल्या वर्षभरात!
१. बारसूच्या आंदोलकांवर काठ्या..
२. आळंदीतील वारकरी बांधवांवर लाठीमार..
३. जालन्यात शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा बंधू भगिनींवर लाठीमार..खोके सरकारच्या एक एक काठीचा हिशेब ठेवला जाईल. याचे उत्तर मतपेटीतून व्याजासकट महाराष्ट्रातील आणि देशातील विद्यमान…
— Ambadas Danve (@iambadasdanve) September 3, 2023
राज्यात ठिकठिकाणी निषेधार्थ आंदोलनं
जालना येथे मराठा आंदोलकांवर 1 सप्टेंबर, शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला. जालन्यातील अंतरावली सराटी इथे हा प्रकार घडला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इथे आंदोलन सुरू होते. आंदोलकांच्या उपोषणाचा शुक्रवारी चौथा दिवस होता, त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात काही आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा समाज आक्रमक झाला. आता या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अनेक जिल्ह्यांत आंदोलनं केली जात आहेत. तसंच, या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. जालन्यात झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा समाजाने मुंबईतील, दादरमध्ये आंदोलन केले. तसंच, मुंबई, पुणे ,बुलढाणा तर सोलापूरमध्ये देखील मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं.
(हेही वाचा: …तर सरकार कारवाई करणार ; मराठा समाजावरील लाठीचार्ज प्रकरणी नितेश राणेंची ग्वाही )