ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याची सूचना?, अंबादास दानवेंनी दिलं स्पष्टीकरण

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचा संशयावरून या गटाने आपल्या पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्याची चर्चा होती. मात्र, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र आयफोन वापरण्याच्या कोणत्याही सूचना नसल्याचे स्पष्ट केले असले तरी राज्य सरकारची यंत्रणा आमच्यावर नजर ठेवून असल्याचा दावा केला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून २०१९च्या विधानसभा निवडणुकीत फोन टॅप झाल्याविषयी विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली होती. जून २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर पुन्हा एकदा फोन टॅप होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार, नेते बाळासाहेबांची शिवसेनेच्या गळाला लागल्याने ठाकरे गटाकडून सावधगिरी बाळगली जात आहे. त्यामुळे फोनवरील संवादासाठी अधिक सुरक्षित असलेला आयफोन वापरावा, अशा सूचना थेट मातोश्रीवरून करण्यात आल्याची चर्चा आज रंगली होती.

मात्र, अंबादास दानवे यांनी या चर्चेचा इन्कार केला. आम्हाला अशा कोणत्याही सूचना नाहीत. राज्य सरकारची यंत्रणा आमच्यावर नजर ठेवून असते. एकमेकांना ही यंत्रणा निरोप देत असते. पण आम्ही त्याला घाबरत नाही. खुल्या दिलाने काम करतो. कोण नेता कुठे जातात, यावर नजर ठेवली जाते. राज्य सरकार निश्चित दबाव टाकत आहे. याला नोटीस दे, त्याच्यावर गुन्हा दाखल कर , हेच धंदे आहेत. मात्र याची भीती शिवसैनिकाच्या मनात नाही. कुणीही गुन्हे दाखल करो, फोन रेकॉर्ड करो, याने आम्हाला फरक पडत नाही. मी विरोधी पक्षनेता म्हणून तसेच ठाकरे गटाचा कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करतो. कुणाला हव्या असतील तर मी स्वतः माझ्या ऑडिओ क्लिप देतो, असे दानवे म्हणाले.


हेही वाचा : …याला भाजपाचं अपयश नाही म्हणता येणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य