मुंबई : शिवसेनेचे बोट धरून उभ्या महाराष्ट्रात मोठ्या झालेल्या भारतीय जनता पक्षाची धुणी भांडी करणे, आठवड्यातून किमान दोनदा दिल्लीला जाऊन मुजरा झोडणे हे ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाटत असतील ते मूर्खांच्या नंदनवनात फिरत आहेत, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. आज (ता. 17 नोव्हेंबर) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 11 वा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने काल (ता. 16 नोव्हेंबर) सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मृतिस्थळावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. मात्र, यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आल्याने त्यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. याच मुद्द्यावरून अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे. (Ambadas Danve’s criticism of Chief Minister Eknath Shinde)
हेही वाचा – शिवाजीपार्क परिसराला छावणीचे स्वरूप, राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थवर दाखल
अंबादास दानवे यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट लिहिली आहे. यामधून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. “शिवसेनाप्रमुख म्हणजे स्वाभिमान, शिवसेनाप्रमुख म्हणजे हिंदुत्वाचा अंगार, शिवसेनाप्रमुख म्हणजे निष्ठा, शिवसेनाप्रमुख म्हणजे प्रेमळ मायेचा हात! यातील एकही गुण हे अलिबाबा गॅंगचे सदस्य अंगीकारू शकलेले नाहीत.. कोणत्या तोंडाने नतमस्तक होता त्या पवित्र स्थळावर जाऊन?” असा प्रश्न देखील दानवे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. तर “खरं तर ज्यांनी आपले स्वातंत्र्य, आपला पक्ष भाजपच्या दावणीला नेऊन बांधण्याचा प्रयत्न केला त्यांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.” असेही दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
काय आहे अंबादास दानवेंची पोस्ट?
खरं तर ज्यांनी आपले स्वातंत्र्य, आपला पक्ष भाजपच्या दावणीला नेऊन बांधण्याचा प्रयत्न केला त्यांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे फक्त त्यांचेच आहेत जे त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत. शिवसेनेचे बोट धरून उभ्या महाराष्ट्रात मोठ्या झालेल्या भारतीय जनता पक्षाची धुणी भांडी करणे, आठवड्यातून किमान दोनदा दिल्लीला जाऊन मुजरा झोडणे हे ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाटत असतील ते मूर्खांच्या नंदनवनात फिरत आहेत.
शिवसेनाप्रमुख म्हणजे स्वाभिमान,
शिवसेनाप्रमुख म्हणजे हिंदुत्वाचा अंगार,
शिवसेनाप्रमुख म्हणजे निष्ठा,
शिवसेनाप्रमुख म्हणजे प्रेमळ मायेचा हात!यातील एकही गुण हे अलिबाबा गॅंगचे सदस्य अंगीकारू शकलेले नाहीत.. कोणत्या तोंडाने नतमस्तक होता त्या पवित्र स्थळावर जाऊन? कारण..
यांनी चालवल्या वारकऱ्यांवर काठ्या..
यांनीच मराठा बांधवांची, बारसू आंदोलकांची डोकी फोडलीत.. शासकीय दवाखान्यात मृत्यूचे थैमान हे यांचेच पाप..
यांनीच गुजरातला महाराष्ट्रात येणारं उद्योग बहाल केले.. आणि वर तोंड करून शिवाजी पार्कात जातात!आम्ही भाजपच्या निष्ठुर राजकारणाला शरण जाणार नाही. हाच ‘पण’ आहे आमचा आजच्या दिनी. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला, समाजकारणाला नवी दिशा देणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या युगप्रवर्तक महानेत्याला विनम्र अभिवादन! जय महाराष्ट्र!!
(टीप: ४० पैसे गॅंग आणि भाडोत्री मंडळाने यावर व्यक्त होताना आपले शब्द नीट तपासावेत. वेड्या वाकड्या लिखाणाची यथेच्छ शाब्दिक धुलाई केली जाईल.)
खरं तर ज्यांनी आपले स्वातंत्र्य, आपला पक्ष भाजपच्या दावणीला नेऊन बांधण्याचा प्रयत्न केला त्यांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे फक्त त्यांचेच आहेत जे त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ… pic.twitter.com/j1c7if6cni
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 17, 2023
काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे आदी दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते. यानंतर एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरुन निघून गेल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते अनिल परब आणि अनिल देसाई यांच्या नेतृत्वात शिवाजी पार्कवर दाखल झाले. यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी होत असल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. ज्यानंतर या ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आणि शिवीगाळसारखे प्रकार घडले. ज्यामुळे आता शिंदे गट आणि ठाकरे गटात आणखी एका वादाली सुरुवात झाली आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करत आहे.