लोकसभा निवडणुकीत अजितदादा पवार यांना फक्त एक जागा मिळाली होती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या होत्या. मात्र, विधानसभेला उलटफेर झाला. अजितदादांच्या पक्षानं 41 जागा जिंकत ‘स्ट्राइक रेट’ वाढवला. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 10 जागा मिळाल्या. अजितदादांच्या पक्षाला मिळालेल्या यशाचं गमक राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांना दिलं जातं.
41 जागा मिळाल्यानंतर नरेश अरोरा यांनी अजितदादा पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ दिल्यावर नरेश अरोरा यांनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवला होता. हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) आमदार अमोल मिटकर यांना चांगलेच खटकले आहे. तसेच, अमोल मिटकरी यांनी पक्षांला मिळालेल्या यशाचं श्रेय नरेश अरोरा यांना देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यावरून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटला उत्तर देताना मिटकरींनी चांगलंच सुनावलं आहे. नेमकं घडलंय काय जाणून घेऊया…
मिटकरींनी काय म्हणालेले?
“डिझाईन बॉक्स नावाची कंपनी फुकट काम करायला आली नव्हती. अशा प्रकारच्या तीन कंपन्या एकनाथ शिंदेंच्या सोबत होत्या. त्या कुठे दिसल्या का? त्यांच्या पक्षाला 51 जागा मिळाल्या आहेत. त्यावेळी कोणत्या संस्थेची हिंमत झाली का शिंदेंच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढायची? तो ( अरोरा ) दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि खांद्यावर हात ठेवतो. आता भारतातीत इतर ठिकाणी निवडणुका आहेत. आपलं दुकान सुरू ठेवण्यासाठी कंपनीनं स्वत:ला लाँच करण्याचा प्रयत्न केला. विजयाचं श्रेय आपल्याकडं घेतलं,” अशी भूमिका अमोल मिटकरींनी मांडली होती.
यानंतर अमोल मिटकरींना टॅग करून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून एक ट्विट करण्यात आलं. त्यात लिहिलं, “अमोल मिटकरी यांची डिझाईनबॉक्स्ड संदर्भातील वक्तव्य ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. त्याचा राष्ट्रवादी पक्षाशी कुठलाही संबंध नाही. डिझाईनबॉक्स्ड टीमनं विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे. पुढेही बजावत राहील. यात शंका नाही.”
हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का..? मी जे वक्तव्य डिझाईन बॉक्स संदर्भात केलं ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाचीच भावना आहे.आमचा साधा प्रश्न आहे,अजित दादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली? हा महाराष्ट्र आहे चंदिगड नाही. चुक कबूल करा. #सॅलरीसोल्जर https://t.co/wZl7kOn7bj
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 26, 2024
अजितदादांच्या राष्ट्रवादीनं ट्विट केल्यानंतर अमोल मिटकरी चांगलेच भडकले आहेत. ट्विट करत मिटकरी म्हणाले, “हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का? मी जे वक्तव्य डिझाईन बॉक्स संदर्भात केलं, ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाचीच भावना आहे. आमचा साधा प्रश्न आहे, अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली? हा महाराष्ट्र आहे, चंदीगड नाही. चूक कबूल करा. #सॅलरीसोल्जर…”
हेही वाचा : नवा CM कोण होणार? शिंदे मुख्यमंत्रिपदावरून नाराज? केसरकरांनी सगळंच क्लिअर सांगून टाकलं…