मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा निर्णय भाजपप्रमाणे आम्हाला मान्य असेल, असं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे भाजपला मुख्यमंत्रिपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं बोललं जात आहे. मात्र, भाजप नेतृत्त्वाच्या मनात काहीतरी वेगळंच चालल्याची चर्चा आहे. त्याचं कारण, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात झालेली बैठक. त्यामुळे भाजपचं नेतृत्त्व धक्कातंत्राच्या तयारीत नाही ना? अशी भीती कार्यकर्त्यांना वाटत आहे.
अमित शहा आणि विनोद तावडे यांच्या तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली. यावेळी गृहमंत्री शहा यांनी विनोद तावडे यांच्याकडून राज्यातील मराठा समाजाविषयी राजकीय समीकरणं जाणून घेतली. त्यामुळे गृहमंत्री शहा यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याचा अंदाज कोणालाही बांधता येत नाही.
हेही वाचा : “फडणवीसांनी खूप अवहेलना सहन केली, पण…”, ‘CM’पदाच्या चर्चेवर भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास निश्चित मानलं जात आहे. यातच गृहमंत्री शहा यांनी तावडेंकडून मराठा समाजाबद्दलची समीकरणं का जाणून घेतली? याबद्दल अनेक तर्कवितर्क बांधले जात आहे. गृहमंत्री शहा हे मराठा चेहरा म्हणून पुन्हा एका एकनाथ शिंदे यांचा विचार करत नाहीत ना? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच, गृहमंत्री शहा आता मराठा मतांची बेरीज-वजाबाकी कशासाठी करत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान, सध्याच्या एकूणच हालचाली बघता मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार, हे जवळपास स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं बोललं जात आहे. पण, ऐनवेळी दुसरेच नाव समोर येणार नाही ना? अशी शंका फडणवीसांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
हेही वाचा : “10 मिनिटांत यांना आमदार केलं, मात्र आता फडणवीसांचा हा पठ्ठ्या…”, राम सातपुतेंचा रणजितदादांना इशारा