घरमहाराष्ट्रअमित शाहांची नजर पश्चिम महाराष्ट्रावर; 19 फेब्रुवारीला येणार कोल्हापुरात

अमित शाहांची नजर पश्चिम महाराष्ट्रावर; 19 फेब्रुवारीला येणार कोल्हापुरात

Subscribe

रविवारी 19 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी स्वतः अमित शहा यासाठी मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी भाजपकडून 'मिशन कमळ' असा नारा दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

अनेकदा प्रयत्न करून देखील कोल्हापुरात कमळ फुलत नसल्याने अमित शहा यांनी स्वतः या जिल्ह्यात मोर्चेबांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रविवारी 19 फेब्रुवारीला कोल्हापूर दौरा करणार आहेत. तर यावेळी त्यांच्याकडून ‘मिशन कमळ’ असा नारा देण्यात येणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. तर मंत्री अमित शहा यांच्या पत्नी या कोल्हापूरच्या असल्याने कोल्हापूरचे जावई सासरी भाजपची ताकद वाढावी यासाठी स्वतः मैदानात उतणार असल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूरच्या शेजारी असलेले जिल्हे सोलापूर आणि सांगली येथे नेहमीच भाजपचे उमेदवार निवडून येत असतात. पण अनेकदा प्रयत्न करून सुद्धा गेल्या 25-30 वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या लोकसभेच्या दोन्ही जागांवर एकदाही कमळ फुलू शकले नाही. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीमुळे या जिल्ह्यात असलेल्या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी होऊन आले. पण सरकार स्थापन करण्याच्यावेळी शिवसेनेने भाजपशी फारकत घेतल्याने भाजपला हा आनंद फार काळ टिकविता आला नाही. पण शिवसेनेमध्ये देखील फूट पडल्याने शिवसेनेतून निवडून आलेले खासदार हे शिंदे गटात गेले. सध्या शिंदे गट आणि भाजपची सत्ता राज्यात आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे का असेना पण भाजपची कोल्हापूरात देखील सत्ता आहे. पण भाजपचे वरिष्ठ नेते यामध्ये समाधानी नसून कोल्हापूरमध्ये भाजपचा हक्काचा उमेदवार निवडून आणण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा स्वतः जातीने या मतदारसंघात लक्ष घालणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – भाजप राज्य अधिवेशनास गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीबाबत अद्यापही ‘अनिश्चितता’

कोल्हापूर लोकसभेचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने हे दोघेही शिंदे गटात आहेत. पण या दोघांवरही शिंदे गटाची मोहोर असल्याने भाजपचा हक्काचा खासदार या जिल्ह्यात नसल्याची खंत भाजपला असल्याचे दिसून येते. ज्यामुळे आता भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावण्यात आला आहे. तसेच लवकरच पक्षाच्या नूतन कार्यालयाची पाहणी सुद्धा करण्यात येणार आहे. तर बूथ आणि शक्तीप्रमुखांची बैठक घेऊन ‘मिशन कमळ’चा नारा देण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे भाजपकडून फक्त कोल्हापूरचं नाही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला लक्ष ठेऊन पुढील रणनीती आखण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा या कोल्हापूरच्या आहेत. त्या कोल्हापुरातील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थिनी आहेत. यंदा ही शिक्षण संस्था शतकमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित शहा हे कोल्हापुरात येणार आहेत. पण याचसोबत राजकीय रणनीती देखील ठरवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -