शरद पवारांवर केलेली टीका हास्यास्पद..,अमोल कोल्हेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेत घेतलेल्या जाहीर सभेनंतर आणि जाहीर सभेत केलेल्या भडकावू वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली होती. अशातच राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेली टीका ही हास्यास्पद आणि तथ्यहीन आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांच्यावर केला आहे.

अमोल कोल्हे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी कोल्हे म्हणाले की, जातीपातीचे आणि धर्माचे मुद्दे पुढे काढून देशासमोरील महागाई, बेरोजगारी, कोळसा टंचाई अशा महत्त्वाच्या प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका हास्यास्पद आणि तथ्यहीन आहे. देशभरातील सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी मोट बांधण्याची क्षमता पवारांमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी अनेकांना धास्ती वाटते, अशा लोकांनीच पवारांविषयी चुकीचा प्रचार चालवला आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकासाठी आराध्यदैवत आहेत. त्यांच्या समाधीविषयी राज जे बोलले त्यावरून त्यांना चुकीची माहिती पुरवण्यात आल्याचे दिसते. अनेक इतिहास संशोधकांनी याबाबतचे पुरावे समोर आणले आहेत. महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शोधली. त्यांनी महाराजांवर पोवाडा लिहिला, असं कोल्हे म्हणाले.

समाधीच्या जीर्णोध्दाराचा विचार पुढे आला त्यावेळी शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, त्यामुळे त्यांच्या समाधीसाठी रयतेने पैसा उभारावा, असा मुद्दा लोकमान्य टिळकांनी मांडला. त्यानुसार निधी उभारण्यात आला. परंतु तत्कालिन डेक्कन बँक दिवाळखोरीत निघाली. त्यामुळे तेव्हा जमा झालेले ८० हजार रूपयेही बुडाले, असं कोल्हे म्हणाले.


हेही वाचा : Weight Lifting : पुण्याच्या हर्षदा गरुडची उंच झेप, जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक