Homeमहाराष्ट्रAmol Kolhe : अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना घरचा आहेर; काँग्रेस-ठाकरे गटाला सुनावले खडेबोल

Amol Kolhe : अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना घरचा आहेर; काँग्रेस-ठाकरे गटाला सुनावले खडेबोल

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची गुरुवारी (ता. 09 जानेवारी) बैठक पार पडली. या बैठकीतून खासदार कोल्हेंनी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खडेबोल सुनावले.

मुंबई : महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. पण सहा महिन्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. त्यामुळे निवडणुकीच्या दोन महिन्यानंतर आता मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, आम्ही एकमेकांवर कुरघोड्या केल्या. फक्त वाटाघाटी करण्यात वेळ घालवला, असे विधान काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केले. त्यांच्यानंतर आता मविआतील एकेक नेते याबाबतच वाच्यता करण्यास सुरू झाले असून मविआमध्ये वादाची ठिणगी पडण्यास सुरुवात झाली आहे. (Amol Kolhe gave harsh words to the Congress-Thackeray group)

काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी तर मित्रपक्षांना खडेबोल सुनावत त्यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची गुरुवारी (ता. 09 जानेवारी) बैठक पार पडली. या बैठकीतून खासदार कोल्हेंनी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खडेबोल सुनावले. विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही, तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही, असे टीकास्त्र कोल्हेंनी डागले आहे. तर, राज्यात मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस आहे. तर पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणांत होतो, त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा, असे आवाहन खासदार कोल्हेंनी पदाधिकाऱ्यांना केले आहे.

हेही वाचा… CM Fadnavis : मुख्यमंत्र्यांची वॉर रुम सक्रीय; एकाच दिवसात वाढवण बंदर, बीडीडी चाळ, मुंबई मेट्रोसंबंधीचे निर्देश

तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे, असे विधानही यावेळी अमोल कोल्हेंनी केले आहे. पण आता खासदार अमोल कोल्हे यांनी थेट काँग्रेस आणि ठाकरे गटाला लक्ष्य केल्याने याबाबत या दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून नेमके काय प्रत्युत्तर देण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सतत या ना त्या कारणावरून वादाची ठिणगी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात आता भरीसभर म्हणून खासदार कोल्हे यांच्या विधानाने आग पेटवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पण विधानसभा निवडणुकीत मविआमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून मोठा घोळ झाला आणि या घोळामुळेच मविआला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक गमवावी लागल्याची भावना मविआच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.