घरमहाराष्ट्रAmol Kolhe : अजित पवारांच्या 'काकाका' टीकेला अमोल कोल्हेंचे कवितेतून चोख प्रत्युत्तर,...

Amol Kolhe : अजित पवारांच्या ‘काकाका’ टीकेला अमोल कोल्हेंचे कवितेतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले…

Subscribe

मुंबई : स. का. पाटलांचा प्रचार करताना ‘पापापा’ असे लिहून प्रचार केला जात होता. पापापा म्हणजेच पाटलाला पाडले पाहिजे, आता ‘काकाका’ असे लिहून प्रचार केला पाहिजे, असे म्हणत काल (ता. 14 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावला. त्यांच्या या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संतापले आहेत. शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल्यानंतर आता खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना कवितेच्या माध्यमातून सुनावले आहे. (Amol Kolhe’s poetic response to Ajit Pawar’s ‘Kakaka’ criticism)

हेही वाचा… Bhujbal vs Manoj Jarange : श्रेय घेण्यासाठीच जरांगेंचे उपोषण; भुजबळांचा हल्लाबोल

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनाच प्रतिप्रश्न केला आहे. कोणीतरी म्हणाले की काका का? पण जनता म्हणते अजूनही काकाच का? असा प्रश्न उपस्थित करत कोल्हेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी अजित पवार यांना खडेबोल सुनावले आहेत. पक्ष मिळाला, चिन्ह मिळाले, सगळं काही मनासारखं झाले तरी अजूनही काकाच का? असा प्रश्नही कोल्हेंनी विचारला आहे.

कुणीतरी म्हणालं काका का?
जनता म्हणाली अजूनही काकाच का?
पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं, सगळं मनासारखं झालं
तरी अजूनही काका, का काका?
बोलवताना धनी पुरेपूर जाणतो काका का,
पण महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे, काकाच का?

- Advertisement -

कारण, काका फक्त माणूस नसतो, काका फक्त नेता नसतो
50 वर्षे महाराष्ट्राच्या मातीतून, महाराष्ट्राच्या माणसांतून वाहणारा काका एक विचार असतो
सर्वसामान्य शेतकरी, महिला प्रत्येक वर्गाला मुजोर व्यवस्थेला का? हा प्रश्न विचारण्याची ताकद देतो

काटेवाडीच्या का पासून ते कारगिलच्या का पर्यंत, काळ्या मातीच्या का पासून ते कणखर कातळाच्या का पर्यंत महाराष्ट्राची, दिल्लीतली ओळख काका, काकाच असतो

कांदा, कापसापासून कारखान्याच्या का पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचा आधारा काका असतो
शेताच्या बांधावर काका असतो,
विचारवंतांच्या बैठकीत काका असतो
उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो, म्हणून महाराष्ट्राचा अभिमान काका असतो

म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्रसमोर झुकवण्यासाठी काका हवा असतो
महाराष्ट्राला स्वाभीमानाने लढण्यासाठी काकाच हवा असतो
म्हणूनच, काका का आणि काकाच का हे स्वाभीमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो

अमोल कोल्हे यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या गोड शब्दातून अजित पवारांवर टीका केली आहे. तर या कवितेच्या माध्यमातून त्यांनी अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. ज्यामुळे आता कोल्हेंच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) नेमके काय प्रत्युत्तर देण्यात येते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -