मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दारुण पराभव झाला. त्यांच्या या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने निशाणा साधला आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांनी पराभव स्वीकारण्याचे औदार्य दाखवावे, असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी केले आहे. यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे तसेच सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला. (Amol Mitkari criticized NCP SP and Amol Kolhe)
हेही वाचा : Sanjay Raut : मविआच्या पराभवाचे कारण काय? राऊतांनी स्पष्टच सांगितले…
पत्रकारांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “ज्याप्रकारे गद्दारीचा डाग, काळा डाग अशी टीका करणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना मला विचारायचे आहे की, आज तुम्ही माध्यमांसमोर येऊन लोकशाहीत लोकांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, असे म्हणण्याची धमक का दाखवू शकत नाही?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच, “पराभव स्वीकारण्याची दानत फक्त अजित पवार यांच्याकडे होती. बारामतीमध्ये लोकसभेत झालेला पराभव अजित पवार आणि आम्ही स्वीकारला होता. माझ्याकडून चूक झाली हे त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केले होते.” असे विधान त्यांनी यावेळी केले.
“आज त्यांनी (पवार गट) चूक कबुल करावी. बारामतीत अजित पवार यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार देऊन मोठी चूक केली, हे मान्य करून सुप्रिया सुळे यांनी चूक मान्य करण्याचे औदार्य दाखवावे, एवढीच आमची अपेक्षा आहे.” असे विधान अमोल मिटकरी यांनी केले आहे. “मला जयंत पाटील यांच्याबद्दल वाईट वाटते, ते विजयानंतर प्रमाणपत्रदेखील घ्यायला गेले नाहीत. त्यांनी आपला आनंदोस्तव पण साजरा केला नाही.” असे म्हणत त्यांनी पुढे टोला लगावला. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 132 जागांवर, शिवसेना शिंदे गटाला 57 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे महायुतीने तब्बल 230 जागा जिंकल्या. तेच महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवरच विजय मिळवता आला. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला अवघ्या 10 जागांवर विजय मिळाला.