लोकसभेसाठी अमोल मिटकरी इच्छुक? १९ खासदार जिंकणार असल्याचा राऊतांचा दावा

amol mitkari

आगामी काळात येणाऱ्या निवडणुकींसाठी महाविकास आघाडीकडून महत्त्वाच्या बैठका घेतल्या जात आहेत. सध्या जागावाटपाच्या चर्चांसाठी चाचपणी सुरू झाली आहे. तिन्ही पक्ष कोणत्या जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि कोणत्या सोडायच्या यावर मोर्चेबांधणी करत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यातच जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अकोल्याची जागा जर राष्ट्रवादीकडे आली तर, मी त्या जागेवरून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहे, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्वीटही केलं होतं.

अमोल मिटकरी यांनी परमबीर सिहांच्या नोकरी बहालीवरून भाजपवर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारवर १०० कोटींचा आरोप करून बदनाम केले गेले, त्या परमबीर यांना भाजपाने नोकरीच्या सेवा पुन्हा बहाल केल्या. परमबीर त्यांनी केलेले आरोपही सिद्ध करू शकले नाहीत. भाजपाचे ते एजंट होते. रश्मी शुक्ला यांना भाजपाने महाराष्ट्रभूषण जाहीर केला तरी काही वाटणार नाही, तसाच परमबीर यांना देखील करावा, असा आरोप मिटकरी यांना केला आहे.

मविआमध्ये ४८ जागा तीन पक्षांत समान वाटण्याचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली होती. परंतु ही माहिती खोटी असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच शिवसेनेचे लोकसभेत १९ खासदार जिंकून येणार असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

जागा वाटपांबाबत कोणीही बोलू नये – नाना पटोले

जागा वाटपाबाबत अजूनही काही ठरलेलं नाही. जागा वाटपांबाबत कमिटी बनवून त्यावर निर्णय घेतला जाईल. लोकसभेच्या मेरिटच्या आधारावरच जागा वाटप केलं जावं, अशी आमची भूमिका आहे. आम्ही इतक्या जागा लढवणारच आणि जिंकणारच असं वक्तव्य कोणीही करु नये, असं म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. जागा वाटपाबाबत चर्चा सुरु झाल्यावर कोणत्या जागा कोणी लढवाव्या हे स्पष्ट होईल. भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं हाच मविआचा मूळ उद्देश असल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. त्यामुळे जागा लढण्यापेक्षा जागा कशा जिंकल्या जातील या सर्व गोष्टींची चर्चा व्हावी, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं, नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा :ना.. ना… जागा वाटपांबाबत कोणीही बोलू नये; पटोलेंचा राऊतांना सबुरीचा