अकोला : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवले. भाजप, शिवसेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील या निवडणुकीत 41 जागांवर विजय मिळवला. लोकसभेपेक्षा विधानसभेत केलेल्या कामगिरीनंतर अजित पवार यांचे अनेक स्तरांतून अभिनंदन करण्यात आले. याचदरम्यान, अजित पवारांचे माध्यम सल्लागार नरेश अरोरा यांनीसुद्धा त्यांचे अभिनंदन केले. त्यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत फोटोसेशनदेखील केले. पण आता याच फोटोंवरून अरोरा यांच्यावर टीका होत आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवलेला पाहून संताप व्यक्त केला आहे. (Amol Mitkari ncp on naresh arora photo with ajit pawar)
हेही वाचा : Maharashtra Election Results 2024 : EVM वर शंका नाही पण…; आव्हाडांनी पोस्ट केली चक्रावणारी आकडेवारी
राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी म्हणाले की, “नरेश अरोरा याची अजित पवारांच्या खाद्यांवर हात ठेवण्याची हिंमतच कशी झाली?” असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. “विधानसभा निवडणुकीतील अजित पवारांचा विजय हा त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. कोणत्याही गुलाबी रंगाची जादू नव्हती, अजित पवार यांच्या खांद्यावर हात पाहून मनाला वेदना झाल्या. बहुआयामी व्यक्तीमत्वाच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्यांना माझ्यासारख्या दादांचा सैनिक हे माफ करणार नाही,” अशा शब्दात त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केली होती. मात्र काही वेळानंतर ती पोस्ट डिलिट करण्यात आली.
महाराष्ट्र आहे, चंदीगड नाही : अमोल मिटकरी
दरम्यान, अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्वीट काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्वीटरवरून आपली भूमिका स्पष्ट केली. अमोल मिटकरी यांचे ‘डिझाईनबॉक्स्ड’ संदर्भातील केलेले विधान ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. ‘डिझाईनबॉक्स्ड’ टीमने विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे आणि पुढेही बजावत राहणार यात शंका नाही. ” असे म्हणत उलट अमोल मिटकरी यांनाच सुनावले.
हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का..? मी जे वक्तव्य डिझाईन बॉक्स संदर्भात केलं ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाचीच भावना आहे.आमचा साधा प्रश्न आहे,अजित दादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली? हा महाराष्ट्र आहे चंदिगड नाही. चुक कबूल करा. #सॅलरीसोल्जर https://t.co/wZl7kOn7bj
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 26, 2024
असे असले तरीही अमोल मिटकरी यांनी पक्षाच्या भूमिकेवरही सवाल करत खडेबोल सुनावले. त्यांनी पक्षाच्या ट्वीटवर म्हंटले की, “हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का? मी जे विधान डिझाईन बॉक्स संदर्भात केले, ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाचीच भावना आहे. आमचा साधा प्रश्न आहे, अजित दादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली? हा महाराष्ट्र आहे, चंदीगड नाही. चुक कबूल करा.” असे म्हणत त्यांनी टीका केली.