बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरभरून मदत द्यावी, अमोल मिटकरींची मागणी

Amol Mitkari

मुंबई  – पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बैलपोळा हा शेतकऱ्यांचा प्रिय सण येत आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राच्या सर्वच भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा विषय हा राजकारणाचा विषय नसून तो सामान्य शेतकऱ्यांचा विषय आहे. राज्य सरकारने पोळ्याच्या पूर्वसंध्येला ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरभरून मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रस्तावावर बोलताना केली.

आमच्या विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहून ती शेतकऱ्यांना अर्पण केली होती. अर्पण पत्रिकेत महाराजांनी लिहिले होते की, “तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकलांचे लक्ष तुझ्याकडे वळो”. तसेच संत गाडगेबाबा यांनी आपल्या कृतीतून शेतकऱ्यांना न्याय दिला होता, याचे स्मरणही अमोल मिटकरी यांनी केले.

वर्धा जिल्ह्यात आज एका ३६ वर्षीय शेतकऱ्याने विजेची तार तोंडात ठेवून आत्महत्या केली. ही खूप दुर्दैवी बाब आहे. राज्यात मागील एका महिन्यात १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय काढल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून प्रतिप्रश्न विचारुन आधीची आकडेवारी सादर केली जाते. मात्र, कुणाच्या काळात काय झाले हा विषय आता न काढता शेतकऱ्यांचे कष्ट महत्त्वाचे मानून त्याला मदत केली पाहिजे. जर प्रशासनातील अधिकारी मुजोरी करत असतील आणि शेतकऱ्यांची भावना समजून घेत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केली.

यावेळी अमोल मिटकरी यांनी आकडेवारीसहीत सरकारला धारेवर धरले. सोयाबिनच्या एक एकराच्या पेरणीचा खर्च ११ हजार ७०० रुपये, कापसाचा प्रतिएकरी खर्च ११ हजार ५७० रुपये आहे. सरकारने हेक्टरी केवळ १३ हजारांची मदत जाहीर केली असून ही मदत अतिशय तुटपुंजी आहे. एवढ्या कमी पैशात शेतकऱ्यांची गुजराण कशी होणार? त्यांचा प्रपंच कसा चालणार? असे प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले.

माझ्या अकोला जिल्ह्यात दोन – दोन वेळा पेरणी केली तरी वाया गेली. हजारो हेक्टर जमिनीचे अकोला जिल्ह्यात नुकसान झाले आहे. महामंडळाचे सोयाबिनचे बियाणे बोगस निघाले. दोनदा पेरणी केलेली वाया गेली. त्यामुळे अकोला जिल्ह्याला भरीव मदत करण्याची मागणीही अमोल मिटकरी यांनी केली.

मागच्या आठवड्यात आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली. कृष्णाने आपल्या हंडीतून गोरगरीब सवंगड्यांना, सुदाम्याला देखील बरोबरीचा हिस्सा दिला. तसे सरकारने देखील गरीब शेतकऱ्यांना मदत द्यावी. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. पिकांना हेक्टरी ७५ हजार आणि फळबागांना हेक्टरी दीड लाखाची मदत करावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.