नवी दिल्ली : विभागीय शहर असणाऱ्या अमरावतीत विमानतळ कधी सुरू होणार? असा सवाल अनेक वर्षांपासून अमरावतीकर करत होते. अखेर त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार असून नुकतेच अमरावती विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCI) एरोड्रम परवाना मिळाला आहे. हवाई उड्डाणासाठी आवश्यक असलेला परवाना मिळाल्यामुळे आता अमरावती विमानतळावरून हवाई उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे. अलायन्स एअरचे अमरावती-मुंबई-अमरावती असे विमान त्यामुळे या महिनाअखेरीस पासून धावणार आहे. डीजीसीएचे हे प्रमाणपत्र प्रातिनिधीक स्वरुपात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या (MADC) एमडी स्वाती पांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपविला. (Amravati Airport gets aerodrome license from DGCI)
हेही वाचा : CM Fadanvis meet PM Modi : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, झाली या विषयांवर चर्चा
दरम्यान, 31 मार्चला अमरावती विमानतळावरून विमानाची पहिली झेप घेतली जाणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी अमरावती विमानतळावर एअर कॉलीबशन ऑफ प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेट अर्थात पीएपीआय चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. या चाचणीद्वारे अमरावती विमानतळावरून मुंबईच्या दिशेने विमान प्रवासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या उड्डाणासाठी नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाकडून परवानगी मागण्यात आली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 मार्चला अमरावती विमानतळ सुरू होणार असे जाहीर केले होते.
पॅसेंजर टर्मिनल इमारत, एटीसी टॉवर अशी महत्वाची सपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली असून सुरक्षा विषयक तपासण्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी पीएपीआय प्रणाली विमानतळावर सज्ज आहे. या दरम्यान, अमरावती विमानतळ भागात उद्योगधंदे, रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. अमरावती विमानतळावर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले असून नवीन धावपट्टी तयार करण्यात आली आहे. 18 बाय 50 मीटरची ही धावपट्टी असणार आहे. या धावपट्टीवरून एटीआर हे 72 आसनी विमान उड्डाण घेऊ शकणार आहे.