Amravati violence: अमरावतीमध्ये येऊन कोणीही भडकवण्याचे काम करु नये, यशोमती ठाकूर यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Amravati violence yashomati thakur reaction on devendra fadnavis statement over amravati
Amravati violence: अमरावतीमध्ये येऊन कोणीही भडकवण्याचे काम करु नये, यशोमती ठाकूर यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती घटनेवर बेजबाबदारपणाचे वक्तव्य केलं असल्याचे मला वाटत आहे. ते जबाबदार नेते आणि विरोधी पक्षनेते आहेत परंतु त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप आहे. १२ ची घटना निंदनीय असून १३ नोव्हेंबरची घटना अतिशय निंदनीय आहे असे राज्य सरकारचे मत आहे. दोन्ही घटनांमध्ये असलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. कोणालाही सोडण्यात येणार नाही. असे वक्तव्य अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे की, आता अमरावती जिल्हा शांत आहे. त्यामुळे बाहेरुन येऊन कोणीही अमरावती भडकवण्याचे काम करु नये. दोन्ही प्रकारच्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. गृहमंत्री स्वतः लक्ष ठेवून आहेत. सायबरचा अहवाल सर्वांच्या समोर आहे. दोन्ही बाजूचे कट्टरपंथी आहेत. १२ तारखेला आणि १३ तारखेला समाजाला भडकवण्याचे, विस्फोटक करण्याचे काम करण्यात आले त्यांना सोडण्यात येणार नाही असे यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ज्यांनी ज्यांनी १२ आणि १३ नोव्हेंबरला हिंसा निर्माण करण्याचे काम केलं आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दंगल झाली ते सगळ्या महाराष्ट्राने बघितले आहे. जनतेन आधार दिल्याने शांतता प्रस्थापित करता आली. रझा अकादमीचा फायदा कोणाला होत असतो ते सर्वांना माहिती आहे. ज्या ज्या गोष्टी हिंसा निर्माण करतात अशा लोकांना जे मदत करतात त्या सगळ्या लोकांवर कारवाई नक्की होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाच्या परवानगीवर प्रश्न केला होता. यावर यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे की, कोणीही मोर्चाला परवानगी दिली नव्हती. परवानगी नाकारली होती. त्या ठिकाणी इंटेलिजेंस फेल झाले ते का झाले याचे आश्चर्य आहे, याबाबत चौकशी करणार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, कॅबिनेटमध्ये चर्चा करण्यात येणार असून कारवाईची मागणी करणार आहे. अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.


हेही वाचा : १२ तारखेच्या घटनेवर यशोमती ठाकूर गप्प का?, हिंसा घडवण्यात आली का? फडणवीसांचे सवाल