नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या सातत्याने चर्चेत असतात. सध्या त्या त्यांच्या एका उखाण्यामुळे चर्चेत आल्या आहेत. नागपूरमध्ये झालेल्या एका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात त्यांनी हा उखाणा घेतला. राजकीय परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या या उखाण्याची सध्या चर्चा सुरू आहे.
”देवेंद्रजींकडून घेऊन आले विकासाचं वाण…”
काही महिन्यांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण होतं आहे. आधीच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राचं नुकसान झाल्याची टीका सत्ताधारी पक्षांकडून केली जाते. त्याला विरोधकांकडूनही तेवढ्याच समर्थपणे प्रत्युत्तर दिलं जातं. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर केल्या जाणाऱ्या टीकेच्या संदर्भात अमृता फडणवीसांनी घेतलेल्या उखाण्याची चर्चा केली जात आहे. अमृता फडणवीस आपल्या उखाण्यातून महाराष्ट्र निर्माणाचं काम करण्याचं आवाहन केलं. “ज्यांनी मारले नाकर्तेपणावर बाण, त्या देवेंद्रजींकडून मी घेऊन आले आहे विकासाचं वाण, आपण सगळे एकत्र करू महाराष्ट्र निर्माण”, असा उखाणा त्यांनी घेतला.
हेही वाचा – Shivtirtha: ‘हा पुरावा’, राज ठाकरेंना नांदगावकरांकडून ‘बाबरी’ची विट भेट; म्हणाले, बाळासाहेब असते तर…
नागपुरात भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा त्यांनी हा उखाणा घेतला. अमृता फडणवीस या कार्यक्रमात महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांचा आग्रहावर त्यांनी एक गाणंही गायलं. त्यांचे गाण्यांचे अल्बम्स रिलीज होण्याआधीच चर्चेचा विषय ठरतात. शिवाय त्यांनी केलेली राजकीय टोलेबाजीही व्हायरल होत असते. गेल्या काही महिन्यांत अमृता फडणवीस यांनी घेतलेले उखाणेही व्हायरल झाले आहेत. गेल्या वर्षी नवरात्रौत्सवादरम्यान एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी घेतलेला उखाणा तेव्हाही चर्चेत आला होता. “मी फिरते मळ्यात, नजर माझी तळ्यात, देवेंद्रसारखे रत्न, पडले माझ्या गळ्यात”, असा उखाणा अमृता फडणवीस यांनी तेव्हा घेतला होता.
हेही वाचा – Ajit Pawar Vs Awhad : कधीतरी खरा चेहरा बाहेर येतोच, आव्हाडांचा अजितदादांवर पलटवार