नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, अशी जोरदार चर्चा करण्यात येत होती. मात्र, आता स्वतः फडणवीस यांनी ते विधानसभेचीच निवडणूक लढविणार आहेत आणि ते ही नागपूरमधूनच याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे फडणवीसांच्या केंद्रात जाण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. परंतु, आता देवेंद्र फडणवीस यांचा जनसंपर्क वाढविण्यासाठी आणि पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतची विनंती त्यांना भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. तर अमृता फडणवीस यांनी महिन्याला किमान चार दिवस मतदारसंघासाठी द्यावेत, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. (Amruta Fadnavis will hold a rally for Devendra Fadnavis in Nagpur)
हेही वाचा – …म्हणून लाठीचार्ज झाला; भुजबळांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला, जरांगेंवर केले गंभीर आरोप
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधूनच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. साधारणतः 2024 मध्ये ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या जनसंपर्क वाढविण्याच्या कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपने देखील तयारीला सुरुवात केली आहे. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस हे सध्या राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक प्रचार व अन्य कामांत अधिक व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघाकडे पुरेसा वेळ देणे शक्य होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे फडणवीसांच्या मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्याची जबाबदारी मिसेस उपमुख्यमंत्र्यांकडे देण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणि भाजपच्या काही नेत्यांनी अमृता फडणवीस यांना विनंती करत तशा प्रकारच्या सूचनाही केल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी दर महिन्याला किमान चार दिवस असे चाळीस दिवस निवडणूक तयारीसाठी द्यावेत. त्याशिवाय त्या मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील, जनसंपर्क साधून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास मदत करतील, मतदारनोंदणी व अन्य निवडणूक तयारीच्या कामातही सहभागी होतील, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता अमृता फडणवीस यांचाही मोर्चेबांधणी संदर्भातील कार्यक्रम तयार करण्यात येत असल्याची माहिती भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून देण्यात आली आहे.