बदलापूर : चंदेरी किल्ल्यावर मेघडंबरीसह स्थापन होणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती

बदलापूर शहरालगत असलेल्या चंदेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मेघडंबरी सहित स्थापना करण्यात येणार आहे. १० मार्चला तिथी प्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या दिवशी विधिवत पद्धतीने पूजा करून मेघडंबरीची स्थापना करण्यात येणार आहे.

An idol of Chhatrapati Shivaji Maharaj will be installed at Chanderi Fort along with Meghdambari

बदलापूर शहरालगत असलेल्या चंदेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मेघडंबरी सहित स्थापना करण्यात येणार आहे. १० मार्चला तिथी प्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या दिवशी विधिवत पद्धतीने पूजा करून मेघडंबरीची स्थापना करण्यात येणार आहे. बदलापूर मधील अजिंक्य हायकर्स या गिर्यारोहक संस्थेच्या वतीने चंदेरी किल्ल्यावर ही मूर्ती बसवण्यात येणार आहे.

सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील बदलापूर शहरालगत असलेला चंदेरी हा गडदुर्ग गिर्यारोहकांसाठी आकर्षण आहे. हा किल्ला म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड असा हा कठीण दुर्ग आहे. अतिशय कठीण असलेला हा दुर्ग सर केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन व्हावे, या हेतूने अजिंक्य हायकर्स या संस्थेने २००८ साली किल्ल्यावर फायबरच्या मूर्तीची स्थापना केली होती. मात्र आता मूर्ती जीर्ण झाल्याने या ठिकाणी मेघडंबरीची स्थापना करण्यात येणार आहे. मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी बदलापूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यानंतर स्टेशन पाडा परिसरात या मुर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

तसेच दोन दिवस गांधी चौकातील मराठी शाळेत शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी सुप्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांनी चित्रसंगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले. ५ मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती किल्ल्यावर नेण्यात आली. ही मूर्ती अजिंक्य हायकर्स, राजमुद्रा हायकर्स, सह्याद्री एडव्हेंचर, युवामंच कांदिवली, आणि चिंचवली गावातील ग्रामस्थांच्या मदतीने किल्ल्यावर नेण्यात आली. नव्याने तयार करण्यात आलेली मूर्ती ही पंचधातुपासून बनवण्यात आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या मूर्तीचे वजन तब्बल ९० किलो आहे. ३८ वर्षांपूर्वी पहिल्यांदा अजिंक्य हायकर्स या संस्थेने किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन केली असल्याची माहिती संस्थेच्या सदस्यांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – …अन् पैलवानाने कुस्तीच्या लाल मातीतच सोडले प्राण

दरम्यान, नव्याने तयार करण्यात आलेल्या मूर्तीचा खर्च हा शिवप्रेमींनी निधी स्वरूपात गोळा केला आहे. यामध्ये महाराष्ट्रचं नाही तर राजस्थान, पंजाब, आणि इतर राज्यातील शिवप्रेमींनी देखील भरगोस मदत असल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्याने तयार करण्यात आलेली मेघडंबरीसहित मूर्ती बदलापूर शहरातील सुप्रसिद्ध मूर्तिकार तेजस भोईर यांनी साकारली आहे. येत्या १० मार्चला आयोजित करण्यात आलेल्या स्थापना सोहळ्यात शहरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अजिंक्य हायकर्स संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.