स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबात सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते. त्यानुसार, या याचिकेवरही मुंबई उच्च न्यायालयात आजच सुनावणी आहे.

Supreme Court

नवी दिल्ली – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत (Local Bodies Election) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. ९२ नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण (OBC Political Reservation), थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबत आज सुनावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या विषयावरील सुनावणी रखडली होती. मात्र, आज होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे.

हेही वाचा – ओबीसी आरक्षणाची सुनावणी आता विशेष खंडपीठात

महाराष्ट्रातील ९२ नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही यावर सर्वोच्च न्यायालयात २३ ऑगस्ट रोजी शेवटची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने स्थिती जैसे थे ठेवत ओबीसी आरक्षणावरील सुनावणी ५ आठवड्यांनी पुढे ढकलली होती. सोबतच सुनावणीसाठी विशेष खंडपीठाची स्थापना करणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आधीच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करावे तसेच राज्यातील ९२ नगर परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करावे, अशी मागणी करणारी याचिका शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षण स्थगित ठेवण्याचा आदेश दिला होता.

राज्य निवडणूक आयोगाने पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलडाणा या १७ जिल्ह्यांतील ९२ नगर परिषदा आणि ४ नगरपंचायतींमध्ये निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.

हेही वाचा – ओबीसी आरक्षण : …तर पुनर्विचार याचिका दाखल करणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती

सर्वोच्च न्यायालयाने २० जुलैला बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, परंतु त्याआधी जाहीर झालेल्या ९२ नगर परिषदांसाठी हा निर्णय लागू होत नव्हता. त्यामुळे शिंदे सरकारने याचिका दाखल करीत सर्वोच्च न्यायालयाने २० जुलै आणि २८ जुलै रोजी दिलेले आदेश मागे घेण्यात यावेत, अशी विनंती केली होती. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती जे. बी. पार्दीवाला यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करताना पुढील ५ आठवड्यांसाठी परिस्थिती जैसे थे ठेवावी, असे निर्देश दिले होते. त्यानंतर, थेट आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना याचिका उच्च न्यायालयात

मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबात सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते. त्यानुसार, या याचिकेवरही मुंबई उच्च न्यायालयात आजच सुनावणी आहे.