Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र त्र्यंबकेश्वर मंदिराला धूप दाखवण्याची मुस्लिमांची जुनी परंपरा

त्र्यंबकेश्वर मंदिराला धूप दाखवण्याची मुस्लिमांची जुनी परंपरा

Subscribe

त्र्यंबकेश्वर मंदिरात काही मुस्लीम धर्माच्या लोकांनी चादर चढवण्याचा प्रयत्न केल्याची अफवा वार्‍याच्या वेगाने पसरल्यानंतर त्याची झळ राज्याच्या राजकारणाला बसली आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचेसुद्धा आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात ‘आपलं महानगर’ प्रतिनिधींनी त्र्यंबकेश्वरच्या काही जुन्या रहिवाशांशी चर्चा केली असता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाच्या पायरीजवळ येऊन श्रद्धेने धूप दाखवण्याची मुस्लीम बांधवांची जुनी परंपरा असल्याचे स्पष्ट झाले. दरवर्षी ही धूप दाखवण्यात येते तेव्हा वाद होत नाहीत. यंदाच असा वाद का घातला जात आहे, असा प्रश्न आता उरुस आयोजकांना पडला आहे.

गेल्या २ दिवसांपासून नाशिक शहराजवळील त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यावरून वाद उद्भवला आहे. देवस्थानने या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनीदेखील दोन्ही बाजूंची सलोखा बैठक घेत हा वाद गैरसमजातून झाल्याचे स्पष्ट करीत वाद मिटल्याचे सांगितले. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुस्लीम धर्मियांचा हा पूर्वनियोजित कट होता की या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन दोन समाजांत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रश्न घेऊन ‘आपलं महानगर’ प्रतिनिधीने त्र्यंबकेश्वरमधील जुने रहिवासी आणि उरुस आयोजकांशी याबाबत चर्चा केली. त्यातून असे लक्षात आले की, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळच असणार्‍या दर्ग्यात दरवर्षी उरुस भरतो.

- Advertisement -

दर्ग्याला चादर चढवल्यानंतर डोक्यावर फुलांच्या माळा आणि चादर घेऊन त्र्यंबकेश्वर नगरीतून मिरवणूक काढली जाते. यंदादेखील याच पार्श्वभूमीवर उरुसाची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आल्यानंतर उरुसातील सेवेकरी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाच्या पायरीजवळ येऊन त्र्यंबकेश्वराला श्रद्धेने धूप दाखवतात आणि पुढे मार्गस्थ होतात. अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळली जात आहे. त्या दिवशीसुद्धा धूप दाखवण्यासाठी आले होते. उत्तर दरवाजाजवळ जाऊन धूप दाखवण्याचा आग्रह होता. मंदिराच्या गाभार्‍यात जाण्याचा प्रयत्न नव्हता, असे स्पष्टीकरण उरुसचे आयोजक मतीन सय्यद यांनी दिले.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणासंदर्भातील वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडीओ २ दिवसांपूर्वीचे असल्याचा दावा केला जात आहे, ज्यात इतर धर्मियांना हटकण्यात आल्याचे दिसत आहे, तर काही व्हिडीओंमध्ये तरुण उत्तर दरवाजा ओलांडून धूप दाखवताना दिसत आहेत, मात्र ते व्हिडीओ कधीचे आहेत हे स्पष्ट होत नाही. पोलीस तपासात त्याची सत्यता उघडकीस येण्याची शक्यता आहे. उरुस आयोजकांनी सांगितले की, दरवर्षी आम्ही अशा प्रकारची मिरवणूक काढतो आणि देवाला धूप दाखवतो. तिथून पुढे आमची मिरवणूक मार्गस्थ होते. मागच्या वर्षीही त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी वाद झाला नव्हता. याच वेळी वाद का निर्माण होतोय, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.

- Advertisement -

धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न
त्र्यंबकेश्वरमध्ये दरवर्षी संदलनिमित्त उरूस काढण्यात येतो. यानंतर बाहेरच्या प्रवेशद्वारावर धूप देण्याची परंपरा असल्याचे सांगितले जाते, मात्र यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. याबाबत पोलीस तपासातून सत्य बाहेर येईलच, परंतु पोलिसांची दक्षता व स्थानिक नागरिकांनी दाखविलेल्या संयमामुळे या घटनेला गंभीर वळण लागले नाही.

- Advertisment -