अज्ञाताने शरद पोक्षेंच्या गाडीची काच फोडली…!

नगरच्या मनमाड मार्गावरील श्रद्धा हॉटेलसमोर साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

sharad ponkshe
अज्ञाताने शरद पोक्षेंच्या गाडीची काच फोडली...!

अभिनेते शरद पोंक्षे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या बद्दलच्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. दरम्यान, आज त्यांच्या गाडीची काच अज्ञाताने फोडली. शरद पोंक्षे यांच्यावरील रागातून हा प्रकार घडला नाही ना, असे तर्क वितर्क लगावले जात आहेत. मात्र, चोरीच्या उद्देशाने हा प्रकार केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

नगरच्या मनमाड मार्गावरील श्रद्धा हॉटेलसमोर साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. नगर येथे १००वे नाट्यसंमेलन होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी शरद पोंक्षे आणि मध्यवर्ती नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद झाल्यानंतर पुढील प्रवासाला निघण्यासाठी गाडीजवळ आले असता त्यांच्या गाडीची काच फोडल्याचे लक्षात आले. तेथे अनेक गाड्या असताना केवळ पोंक्षे यांच्याच गाडीची काच का फोडली गेली? यावरून आता चर्चेला उधाण आले आहे. यासह रस्त्यावरचा एखादा दगड दुसऱ्या वाहनांमुळे उडून काचेला लागला असावा असाही अंदाज लावला जात आहे. या घटनेनंतर शरद पोंक्षे दुसऱ्या गाडीने निघून गेले. प्रसाद कांबळी यांनी शरद पोंक्षेची गाडी नाट्य परिषदेच्या स्थानिक कलावंतासोबत दुरुस्तीसाठी पाठवली.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. शरद पोंक्षे यांनी काही दिवसांपूर्वी सावरकर यांची तुलना महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली होती. त्या रागातून कोणीतरी हे कृत्य केले का? याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.