घरताज्या घडामोडीस्वतःचं १०० टक्के वेतन मदत म्हणून देणार - आंनद महिंद्रा

स्वतःचं १०० टक्के वेतन मदत म्हणून देणार – आंनद महिंद्रा

Subscribe

करोना संकटावर मात करण्यासाठी मदतीची तयारी दाखवणारे पहिले उद्योगपती म्हणून आनंद महिंद्रा समोर आले आहेत.

जगभरात झपाट्याने पसरत चाललेल्या जीवघेण्या करोना व्हायरसचे देशावरील संकट दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. करोना व्हायरसला रोखण्यासाठी केंद्रासोबतच राज्य सरकारकडूनही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आकड्यात अशीच वारंवार वाढ होत गेल्यास देशात करोना संकट तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. परिणामी, देशातील आरोग्य सेवेवर परिणाम होईल आणि वैद्यकीय सेवेवर तणाव प्रचंड वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे. करोना संकटावर मात करण्यासाठी मदतीची तयारी दाखवणारे पहिले उद्योगपती म्हणून आनंद महिंद्रा समोर आले आहेत.

- Advertisement -

म​हिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना व्हेंटिलेटर्स बनवण्यापासून, Mahindra Holidays चे रिसॉर्ट्स देण्यासह स्वतःचं १०० टक्के वेतनही मदत म्हणून देणार असल्याचं म्हटलंय. महिंद्रा यांनी याबाबत रविवारी एकापाठोपाठ पाच ट्विट करुन माहिती दिली. “तज्ज्ञांनुसार भारत करोना संकटाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचलाय किंवा तिसऱ्या टप्प्याच्या अगदी दारात उभा आहे. त्यामुळे करोनाग्रस्तांच्या संख्येत काही पटीने वाढ होण्याची शक्यता आहे. काही आठवडे लॉकडाउन हाच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेवरील दबावही थोडा कमी होईल. पण, आपल्याला अजून बरीच तात्पुरती रुग्णालये तयार करण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याकडे व्हेंटिलेटरची कमतरता आहे. त्यामुळे आमच्या उत्पादन सुविधांद्वारे ( manufacturing facilities) व्हेंटिलेटर्स बनवण्यासाठी काय करावं लागेल यावर महिंद्रा ग्रुप तातडीने काम सुरु करेल. आम्ही तात्पुरती काळजी सुविधा केंद्र म्हणून आमच्या महिंद्रा हॉलिडेजचे रिसॉर्ट्स ऑफर करण्यास तयार आहोत. आमची प्रोजेक्ट टीम तात्पुरती काळजी सुविधा केंद्र उभारण्यात शासन/सैन्यदलास मदत करण्यास तयार आहे. तसेच आम्ही करोनामुळे फटका बसलेल्या छोट्या उद्योजकांच्या मदतीसाठी निधी उभारणार असून, त्यात मी माझे १०० टक्के वेतन मदत म्हणून देईल, तसेच आम्ही आमच्या सहयोगींनाही या निधीमध्ये स्वेच्छेने योगदान देण्यास प्रोत्साहित करू” अशा आशयाचे ट्विट महिंद्रा यांनी केले आहे.

पेटीएम’चे मालक ही आले धावून

महिंद्रांच्या ट्विटनंतर काही वेळात ‘पेटीएम’च्या विजय शेखर यांनीही करोनाग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली. करोना संकटाविरोधात व्हेंटिलेटर्स आणि अन्य सुविधांसाठी पाच कोटी रुपये देत असल्याची त्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -