अण्णासाहेब मोरे समर्थकांचा मोर्चा; हा तर पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न

50 कोटींच्या कथित अपहारप्रकरणी मोरे समर्थकांचा मोर्चा

स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख श्रीराम उर्फ अण्णासाहेब मोरे यांच्यावर तब्बल ५० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप धुळे येथील सेवेकरी अमर पाटील यांनी त्र्यंबक पोलीस ठाण्यासह पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केला. या आरोपाचे खंडन करणारे स्पष्टीकरण गुरुपीठातून येणे अपेक्षित होते अन्यथा न्यायालयीन लढाईतून आरोपांना उत्तर देणे क्रमप्राप्त आहे. या सन्माननीय मार्गांचा अवलंब न करता आमदार सीमा हिरे यांच्यासह काही राजकीय नेते आणि सेवेकर्‍यांनी थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. महत्वाचे म्हणजे या मोर्चाचे समर्थन गुरुपीठाचे ट्रस्टी चंद्रकांत मोरे यांनीही पत्रकारांशी झालेल्या संवादात केले आहे. वास्तविक, कायदेशीर बाबींशी संबंधित प्रकरणांमध्ये मोर्चा काढून दबाव आणण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्या नियमात बसते, या मोर्चाची अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का? याला मोर्चा संबोधायचे नसेल तर इतका मोठा जमाव जमल्यास त्याला काय संबोधावे, पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली त्याला काय म्हणावे, असे प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
अमर पाटील यांनी अण्णासाहेब मोरे यांच्यावर केलेल्या आरोपांत तथ्य आहे की नाही याची चौकशी पोलीस आणि धर्मादाय आयुक्तालयाकडून होईलच. परंतु, या आरोपावरुन गुरुपीठाची आणि अण्णासाहेब मोरे यांची बदनामी होत असल्याची भावना जर सेवेकर्‍यांची असेल तर अशावेळी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झालेल्या ‘आपलं महानगर’ वृत्तपत्राकडे सविस्तर खुलासा देणे अपेक्षित होते. कुणालाही थेट गुन्हेगार ठरवण्याचे धोरण ‘आपलं महानगर’चे नाही. वादाच्या मुद्यासंदर्भात दोन्ही बाजू मांडणे हे ‘आपलं महानगर’चे कर्तव्यच आहे. परंतु, दुसरी बाजू मांडण्यास संबंधितांकडून सातत्याने नकार देण्यात आला आणि त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले तर त्याचा दोष कुणाला देणार?  शिवाय न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून निर्दोषत्व सिद्ध करणेही शक्य आहे. गुरुपीठातील ट्रस्टींच्या दाव्यानुसार जर ५० कोटींचा अपहार झाला नसेल तर वैधानिक मार्गाने आरोपांना उत्तर देता आले असते. परंतु, तसे न करता थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढणे हे कोणत्या अर्थाने लोकशाहीचे लक्षण मानावे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. गुन्हा दाखल होण्याआधीच जर तक्रारदाराला गुन्हेगार ठरवण्यासाठी प्रयत्न होत असतील तर ‘दाल में कुछ काला है’ अशीच  प्रतिक्रिया सार्वत्रिकरित्या उमटली नसेल तर नवल!

सेवेकर्‍यांना गृहीत धरू नये! 

दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठाने आजवर केलेल्या समाजोपयोगी कामांना नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु, व्यवस्थेतील त्रुटी वा दोष कुणी सेवेकरी दाखवून देत असेल तर दोष स्वीकारुन त्याअनुषंगाने सुधारणा करणे किंवा झालेल्या आरोपांचे खंडन करणारे सडेतोड स्पष्टीकरण देणे हे दोन सन्मार्ग गुरुपीठाच्या ट्रस्टींकडे आहेत. अध्यात्माचा मार्गही याच प्रक्रियेकडे अंगुलीनिर्देश करतो. परंतु, होणार्‍या चुका कबूल न करता ‘हम करे सो कायदा’ अशा प्रकारची वर्तणूक जर गुरुपीठाकडून होत असेल तर त्याला वाचा फोडणे माध्यमांचे कर्तव्यच आहे. हे कर्तव्य ‘आपलं महानगर’ने प्रस्तुत प्रकरणात बजावले आणि भविष्यातही बजावत राहणार. कथित अपहाराच्या प्रकरणानिमित्त दोन्ही गुरुपीठात सुरू असलेल्या काही प्रथा, पद्धती आणि कुटुंबियांतील सदस्यांना देवत्व प्राप्त झाल्यागत उभे केले जाणारे चित्र यांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु, बहुतांश सेवेकरी सांप्रत काळात माजवले जाणारे स्तोम आणि स्वत:ला देवत्व प्राप्त करुन घेण्याच्या वृत्तीवर कमालीचे नाराज  आहेत. ही नाराजी सेवेकरी कधीही जाहीरपणे बोलून दाखवणार नाहीत. तशी अपेक्षाही त्यांच्याकडून नाही. मोर्चाला झालेली गर्दी म्हणजे समस्त सेवेकरी नाहीत. सेवेकर्‍यांची संख्या काही लाखांत आहेत. त्यामुळे सेवेकर्‍यांच्या मताला वा विचारांना कुणीही गृहीत धरु नये. गुरुपीठातील ट्रस्टींनी अहंकारातून डोळ्यांवर आलेली झापडं दूर करुन आताच जर सेवेकर्‍यांची नाडी ओळखली नाही, त्यादृष्टीने व्यवस्थेत सुधारणा केल्या नाहीत तर लोकांचा उडू पाहणारा विश्वास कायमस्वरुपी गमावण्याची वेळ येईल, इतकेच.