Eco friendly bappa Competition
घर ठाणे खोटे गुन्हे दाखल करण्याऐवजी आम्हाला गोळ्या घाला - आनंद परांजपे

खोटे गुन्हे दाखल करण्याऐवजी आम्हाला गोळ्या घाला – आनंद परांजपे

Subscribe

ठाणे महानगर पालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करणार्‍या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह मा. मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यातील भादंवि 307 हे गंभीर कलम संशयास्पद आहे, असे निरीक्षण ठाणे सत्र न्यायालयाने नोंदविले आहे. ठाणे पोलिसांकडून वारंवार असे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशा पद्धतीने गुन्हे दाखल करणारे पोलीस आयुक्त आता आम्हाला जनरल डायर असल्यासारखेच वाटत आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला पोलीस मैदानात बोलवावे अन् थेट गोळ्या घालाव्यात. आम्ही निधड्या छातीने या गोळ्या झेलू, असे आव्हान देत आता पोलिसांच्या विरोधात जनद्रोह होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला.

15 फेब्रुवारी रोजी ठामपाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची एक ऑडिओ क्लीप वायरल झाली होती. या ऑडिओ क्लीपमध्ये महेश आहेर यांनी डॉ.जितेंद्र आव्हाड यांची कन्या आणि जावई यांची सुपारी दिल्याबद्दलचा संवाद साधल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांनी महेश आहेर हे घरी जात असताना पालिका मुख्यालयाबाहेर त्यांना चोप दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि 307,353 सह विविध कलमे लावून डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे निरीक्षण नोंदविले आहे, याची माहिती आनंद परांजपे यांनी दिली.

- Advertisement -

परांजपे म्हणाले की, डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या जामिनाचा निर्णय देताना न्यायालयाने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील विविध पाच खटल्यांचा आधार घेतला. तसेच आपले निरीक्षण नोंदविताना, ” केवळ तक्रारदार सांगतो म्हणून हल्ला करणार्‍यांच्या हातात हत्यारे होती, असे होत नाही. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेर यांच्याविरोधात वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानेच तक्रारदाराने डॉ. आव्हाड यांचे नाव जाणीवपूर्वक घेतले आहे. प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारीत झालेल्या एकाही चित्रणामध्ये कोणतेही शस्र दिसत नाही. ही मारहाण हात आणि बुक्क्यांनी झाल्याचे दिसत आहे. कोणतेही शस्त्र वापरलेले नसल्याने ठार मारण्याचा उद्देश स्पष्ट होत नसल्याने दाखल केलेला भादंवि 307 हा कलम संशयास्पद आहे, असे नमूद केले आहे.

हर हर महादेव सिनेमाप्रकरणात जे कलम ठाणे जिल्ह्याला लागू होत नाही. ते कलम लावून अटक करण्यात आले होते. त्यावेळीही न्यायालयाने पोलिसांना फटकारले होते. तसेच, मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या 354 च्या गुन्ह्यातही निरीक्षण नोंदविताना न्यायालयाने, या प्रकारात कुठेही विनयभंगाचा हेतू दिसून येत नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. तसेच, आंदोलनात संसदीय शब्द वापरल्यानंतरही 11 पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले होते. पैकी 10 गुन्हे रद्द करण्यात आलेले आहेत. एकूणच न्यायालयाच्या तिन्ही गुन्ह्यातील निरीक्षणांमुळेच ठाणे पोलिसांचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने होत आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे आता लवकरच ठाणे पोलिसांच्या विरोधात ठाणेकर ‘जनद्रोह’ करतील. आपणाला कधी-कधी पोलीस आयुक्त जयजित सिंह हे जनरल डायर असल्यासारखे वाटते. 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बागेत रौलेक्स कायद्याचा विरोध करण्यासाठी जमा झालेल्या आंदोलकांना गोळ्या घालून ठार मारले होते.त्याच पद्धतीने आपण पोलीस आयुक्तांना विनंती करतो कीं, असे खोटे गुन्हे दाखल करण्याऐवजी आम्हाला पोलीस मैदानात बोलवा आणि एके 47 या रायफलने आमच्यावर गोळीबार करा. आम्ही त्या गोळ्या छातीवर झेलू. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जो अधिकार दिला आहे. त्या अधिकाराचा वापर करुन आम्ही या घटनाबाह्य सरकारच्या चुकीच्या कारभाराविरुद्ध मोर्चे, धरणे, घोषणाबाजी या माध्यमातून विरोध करीत राहणारच आहोत, असेही परांजपे म्हणाले.

या प्रकारामागे मुख्यमंत्रीच…

या प्रकारामागे कोण आहे, असे विचारले असता, ‘खोटे गुन्हे दाखल करण्यात ठाणे पोलीस आघाडीवर आहेत. पोलीस आयुक्तांचे सहकारी अतिरिक्त पोलीस आयुक्त डाॅ. पंजाबराव उगले हेदेखील या कामात पुढाकार घेत आहेत. हा सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांच्या दबावाखालीच होत आहे. त्यांच्या थेट इशार्‍यावरच हे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शुक्रवारी विधानसभेत डॉ. आव्हाड भाषण करीत असताना मुख्यमंत्र्यांनी ‘तुमची अजून एक केस माझ्याकडे चौकशीला आलेय’ असे विधान केले. त्यामुळे आमचे म्हणणे आहे की मुख्यमंत्री पोलिसांच्या नावाने आम्हाला घाबरवत आहेत. पण, आम्ही घाबरणार नाहीत. आम्ही राजकीय कार्यकर्ते असून वैचारिक लढाया लढतोय. तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाही, असेही परांजपे म्हणाले.


हेही वाचा : कोण इम्तियाज जलील?, नशीब ठाकरेंनी त्यांना पाठिंबा नाही दिला; आशिष शेलारांचा हल्लाबोल


 

- Advertisment -