ते परत येणार नाहीत, आता प्रयत्न करु नयेत; आमदारांच्या बंडखोरीवरून अनंत गितेंचा ठाकरेंना सल्ला

शिवसेना केवळ महाराष्ट्राची गरज नसून अखंड हिंदू राष्ट्राची गरज आहे, अशा शब्दात अनंत गिते यांनी संताप व्यक्त केला आहे

anant gite slams shivena rebal mlas eknath shinde group requests uddhav thackeray

शिवसेनेच्या डझनहून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकरणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. या बंडखोरीमुळ महाविकास आघाडी सरकार कोसळले, तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय – उतार व्हावे लागले. यामुळे राज्यात भाजपच्या पाठिंब्याने नवं भाजप सरकार अस्तित्वात आले. मात्र बंडखोर आमदारांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सरकार अद्याप अधांतरी असल्याच चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचा गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यात शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी सोमवारी रत्नागिरीच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बंडखोर आमदारांवर टीकास्त्र डागलं आहे.

अनंत गिते म्हणाले की, वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेल्या आमदारांपैक एकही परत येणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता प्रयत्न करु नयेत. मी उद्धव ठाकरेंना सांगणार आहे की, जे गेलेत त्यांना मातीत गाडून टाकू आणि नव्याने शिवसेना उभी करू…. बंडखोरांच्या गळ्यात बांधलेला पट्टा साखळी भाजपच्या हातात आहे. त्यातला एकही परत येणार नाही. असा आरोपही अनंत गिते यांनी केला.

सगळ्यासाठी बेईमान बंडखोर आमदार जबाबदार

बंडखोर आमदारांवर टीका करताना गिते म्हणाले की, बंडखोर आमदार जनतेच्या प्रश्नांसाठी नाही तर वैयक्तिक स्वार्थासाठी तिकडे गेलेत. जे सुरु आहे ते दुर्दैवी आहे, फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी ज्यांनी कुणी बंड केला त्यांना जनतेचं हित काय आहे? ते कोकणच्या विकासासाठी गेलेत का? जनतेच्या प्रश्नासाठी गेलेत का? त्यात नुकसानच होणार आहे. पण या सगळ्या नुकसानाला बेईमान बंडखोर आमदार जबाबदार असतील, असा आरोपही गिते यांनी केला आहे.

तसेच अशाप्रकारे शिवसेनेच्या गळ्याला नख लावण्याचा पाप करु नये असा इशारा मोदींना दिल्याचे त्यांनी सांगितले. मी पंतप्रधान मोदींना इशारा दिला, इशारा हा शब्द मुद्दाम वापरत असून फक्त राजकीय फायद्यासाठी सत्तेसाठी शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी संघटनेच्या गळ्याला नखाला लावण्याचं पाप तुम्ही करु नका, हे सांगण्याचं धाडस माझ्याकडे आहे. तुम्हाला कळत नाही तुम्ही कोणतं पाप करत आहात. शिवसेना केवळ महाराष्ट्राची गरज नसून अखंड हिंदू राष्ट्राची गरज आहे, अशा शब्दात अनंत गिते यांनी संताप व्यक्त केला आहे.


ऑपरेशन कमल फ्लॉप! महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात भाजपचा पक्ष फोडण्याचा डाव; काँग्रेसचं टीकास्त्र