घरमहाराष्ट्रनाशिकआणि गुलमोहराच्या खोडातून वाहू लागला पाण्याचा झरा

आणि गुलमोहराच्या खोडातून वाहू लागला पाण्याचा झरा

Subscribe

अंनिसनी केली पोलखोल, पाईपलाईन गेल्याने पाणी आले बाहेर

नाशिक :  सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अशीच एका घटनेचा फोटो आणि व्हिडिओ शेअर बुधवारी (दि.२८) व्हायरल झाला. वणी रस्त्यावर ओझरखेड जवळ एका झाडातून सतत पाणी वाहत असल्याची चर्चा वार्‍याच्या वेगाने सोशल मीडियावर पसरली. नागरिकांनी हा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी केली. ही बाब अंनिसच्या पदाधिकार्‍यांना समजताच त्यांनी शहानिशा केली असता सत्य समोर आले. हा चमत्कार नसून झाडाखालून पाईपलाईन गेली असून, खोडामध्ये पाणी गेल्याने ते बाहेर आल्याचे समोर आले आहे.

वणी रस्त्यावर ओझरखेड जवळ एका गुलमोहराच्या झाडाच्या मध्यातून अचानक झर्‍यासारखे पाणी येऊ लागले. ही वार्ता परिसरात पसरली. बघता बघता तिथे गर्दी झाली. अनेकांनी हा चमत्कार असल्याचे सांगितले. काहींनी मोबाईलमध्ये चित्रण केले. तर काहींनी तीर्थ समजून बाटलीत ते पाणी भरून घरी नेले. सोशल मीडियात चित्रफित पाहून अनेक नागरिक घटनास्थळी गेले. अनेकांनी या मागचे कारण न जाणून घेता चमत्कार समजून त्यावर विश्वास ठेवला. परिसरात या निमीत्ताने उलटसुलट चर्चेला उधाण आले. मात्र, या बाबतीत खरे कारण समजल्यावर गर्दी थांबली. अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.

गुलमोहर झाडाखालून पाईपलाईन गेली आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर हे झाड लावल्याचे समजते. झाडाची मुळे खाली वाढून पाईपलाईनमध्ये शिरली . झाड जिर्ण होताच पाण्याच्या दाबामुळे मूळ, खोड यातून पाणी वरती आले. पाईपलाईन पाण्याचा प्रवाह थांबविला असता झाडातून पाणी येणे थांबते,याचा अर्थ हा चमत्कार नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. – कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -