…अन् पैलवानाने कुस्तीच्या लाल मातीतच सोडले प्राण

पुणे : पुण्यातील मारूंजी येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलातील पैलवान स्वप्नील ज्ञानेश्वर पाडाळे याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज सकाळी ७.३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पुण्यातल्या मारुंजी येथील कुस्तीचा सराव करताना पैलवान ज्ञानेश्वर याने लाल मातीतच प्राण सोडल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

स्वप्नील हा नेहमीप्रमाणे सरावासाठी मारुंजी मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात आला होता. सरावासाठी आल्यानंतर त्याने सपाट्या मारल्या आणि तो व्यायाम करून नुकताच बसला असताना त्याला जागेवरच हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. त्याला कोसळल्याचे पाहून इतर पैलवानांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या अगोदरच त्याने आपले प्राण सोडले होते.

स्वप्नीलने पुण्यातील कात्रज परिसरातील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलातून प्रशिक्षण घेतले होते. तो सद्या सर्व पैलवानांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे काम करत होता. तसेच अनेक ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी जात होता. कात्रज येथे नुकत्याच झालेल्या एन.आय.एस. कुस्ती कोच परीक्षेत तो राज्यात प्रथम आला होता. तो ‘महाराष्ट्र चॅम्पियन’ देखील आहे. स्वप्नील हा एक युवा पैलवान म्हणून पुण्यात परिचित होता. तो मूळचा मुळशी तालुक्यातील महाळूंगे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

कबड्डीपटूंचा मैदानातच मृत्यू
गेल्या महिन्यात कबड्डीपटूंचा सामन्यादरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. मुंबईच्या मालाड भागात कबड्डी खेळत असताना 20 वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. प्रेक्षकांनी ताबडतोब पोलिसांना माहिती दिल्यानंतर या विद्यार्थ्यांला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी मालाड येथील महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कबड्डी सामन्यात खेळण्यासाठी आला होता. त्याचे नाव कार्तिकराज मल्लन असे आहे. कबड्डी खेळत असताना कार्तिकराजने डेडलाईन पार करून प्रतिस्पर्धी सदस्यांना बाद करण्याचा प्रयत्न करत असताना प्रतिस्पर्धी खेळाडूंनी त्याला समोरून पकडले आणि खाली पाडले. त्यामुळे तो बाद देखील झाला होता. मात्र, तो खाली पडल्यानंतर बेशुद्ध झाला. दोन्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उठलाच नाही.