..अन् आईने आपल्या मुलाला दिला दुसऱ्यांदा जन्म, वाचा नेमकं काय घडलं?

mother

मुंबई – कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण म्हणजे तिचं आई हाेणं. मात्र एका आईने आपल्या मुलाला दुसऱ्यांदा जन्म देण्याची किमया मुंबईतील चेंबूर येथे घडली आहे. २१ वर्षाच्या आपल्या मुलाची किडनी कार्य करण्याची क्षमता कमी झाल्यानंतर आईने त्याला आपली किडनी मुलाला देऊन त्याला पुन्हा नव्याने जन्म दिला आहे. चेंबूरच्या एका खासगी रुग्णालयात पहिल्यांदाच किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे.

चेंबूर येथील रुग्णालयात २१ वर्षांचा एक तरुण काही दिवसांपूर्वी वेदनेने अत्यंत विव्हळत दाखल झाला. मूत्रपिंडाचा आजार असल्याने तो अतिशय अस्वस्थ होता. त्याच्यावर विविध उपचार आणि अनेक पद्धतीने उपचार करून सुद्धा त्याच्या उपचाराला यश येत नव्हते. बऱ्याच चाचण्या केल्यानंतर अत्यंत जिकीरीचा आणि किचकट असा किडनी प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग आता शिल्लक होता. किडनी दातासाठी अनेकांकडे विचारणा केली. तसेच कुटुंबातील काही सदस्यांच्या चाचण्याही झाल्या, पण या चाचण्यात डाॅक्टरांना दाता मिळत नव्हता, अखेर किडनी दाता म्हणून त्याची जन्मदाती आई पुन्हा एकदा समोर आली. त्याच्या आईच्या केलेल्या विविध चाचण्यानंतर त्याची आईची किडनी प्रत्याराेपण करण्याचा निर्णय डाॅक्टरांनी घेतला, ज्यात डाॅक्टरांना यश आले.

दरम्यान, रुग्णालयातील तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारून पहिल्यांदाच रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. यूरोलॉजी, नेफ्रॉलॉजी आणि भुलतज्ज्ञांनी अतिशय चोख कामगिरी बजावली. यासाठी डॉ. अनिल ब्रदू, डॉ. जयेश डबालिया, डॉ. मुकुंद अंदनकर, डॉ. भाविन पटेल, डॉ. राजेंद्र उंबरकर, डॉ. विश्वनाथ बिल्ला, डॉ. दीपा उसुलूमूर्ती, डॉ. गिरीश माधवानी आणि डॉ. अजिंक्य भोसले या डॉक्टरांनी दिवस रात्र मेहनत करून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आणि एका आईला दुसऱ्यांदा आपल्या मुलाला जन्म देण्याची संधी दिली.