यवतमाळ : राज्यात एकीकडे आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच दुसरीकडे आता शेतकऱ्यांच्या संयम सूटत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण, विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना परताव्यापोटी देण्यात येत असलेल्या रक्कमेवरून आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला चोप दिला. ही घटनायवतमाळ तालुक्यातील कारेगाव यावली शेतशिवारात मंगळवारी (21 नोव्हेंबर) दुपारी घडली. या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Angry Shiv Sainiks Beat Up Insurance Company Official Resulting in low returns)
विदर्भातील शेतकरी खरीप हंगामातील शेतपिकांचा विमा शेतकरी मोठ्या प्रमाणात काढतात. असे असतानाच आता त्याच विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना परताव्यापोटी 10 रुपयापेक्षाही कमी पीक विमा नुकसानभरपाई मिळत असल्याची माहिती आहे. आश्चर्य म्हणजे याच यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 78 शेतकऱ्यांना विमा कंपनीने पाच रुपयांपेक्षा कमी मदत दिल्याचा प्रकार समोर आला. दिवाळीपूर्वी विमा कंपनीने 59 हजार शेतकऱ्यांना 41 कोटींची मदत जाहीर केली. या मदत यादीतील नऊ हजार 727 शेतकऱ्यांना एक हजार रुपयेसुद्धा मदत मिळाली नाही. अनेक शेतकऱ्यांना दोन, पाच, दहा रुपये, अशी नुकसानभरपाई मिळाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात 200, 500, एक हजार रुपयांची मदत जमा झाल्याचा प्रकार जाहीर केलेल्या यादीतून समोर आला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला चोप दिला.
हेही वाचा : पाणी, आरक्षण, रुग्णालयातील मृत्यू अन् बरच काही…; मराठवाडाच का धुमसतोय?
घटनेचा व्हिडीओ व्हायर, पोलिसांत तक्रार
ठाकरे गटाच्या शिवसेना मेळाव्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना हवी ती मदत करा असे आदेश दिले होते. अशातच आता विदर्भातील काही शेतकऱ्यांना शेतपिकांचा परतावा मिळत आहे. मात्र मिळत असलेल्या परताव्याची रक्कम ही शेतकऱ्यांची थट्टा उडवणारी अशीच असल्याने ठाकरे गटांच्या शिवसैनिकांसह शेतकऱ्यांनी विमा प्रतिनिधीला चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून, याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.