अपक्ष आमदारांचा अपमान करण्याचा गाढवपणा राऊतांनी केला, अनिल बोंडेंची बोचरी टीका

anil bonde

राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha elections)  नुकतीच पार पडली. यामध्ये राज्यसभेच्या सहापैकी तीन जागांवर भाजपचा विजय झाला, तर तीन जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. मात्र, एका जागेसाठी शिवसेनेला कोल्हापूरातून मोठा फटका बसला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अपक्ष आमदारांविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर आणि काही अपक्ष आमदारांची नावे सांगत भाजपला मतदान केल्याचा आरोप केल्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे.

अपक्ष आमदारांचा अपमान करण्याचा गाढवपणा…

राज्यसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर अनिल बोंडे नागपुरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अनिल बोंडे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला वैतागली आहे. तसेच महाविकास आघाडीसह अपक्ष आमदारही त्यांना वैतागले आहेत. राऊतांना सत्तेचा माज आलाय, ते द्वेषाने पेटलेले आहेत. त्यामुळे त्यांनी अपक्ष आमदारांचा अपमान केला. तसेच अपक्ष आमदारांचा अपमान करण्याचा गाढवपणा राऊतांनी केला, अशी टीका बोंडेंनी केली आहे.

अपक्ष आमदार घोडेबाजारमध्ये खपले

जे राज्यसभेत झालं तेच विधानपरिषदेत होईल, शिवसेनेचे संजय राऊत यांनी अपक्ष आमदाराचा अपमान केला आहे. घोडेबाजारात आमदार विकले गेले असा आरोप केला, हा आरोप संजय राऊतच करू शकतात आणि तो त्यांनी केला आहे. कोणाचाही अपमान कोणीही करू नये, जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तो वर असे आरोप करू नये. मात्र, संजय राऊत यांनी अपमान केला. अपक्ष आमदार घोडेबाजारमध्ये खपले त्यांनी पैसे घेतले, असे आरोप करुन त्यांना बदनाम करण्याचा गाढवपणा दुसरा कोणी करणार नाही ते शिवसेना करत असल्याचे बोंडे म्हणाले.

मुख्यमंत्री जनतेला भेटत नाहीत तर जनतेची कामं कशी करणार?, त्यामुळे शेतकरी, शेतमजूर सगळेच वैतागले आहे. या सरकारमुळे महाराष्ट्राचे वाटोळे होत आहे. लोकांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळाची आठवण होत आहे, पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी जनतेची इच्छा असल्याचं बोंडे म्हणाले.


हेही वाचा : मी मविआच्याच उमेदवारांना मते दिली; संजय राऊतांच्या आरोपानंतर अपक्ष आमदाराचे स्पष्टीकरण