हे सर्व निस्तरणार तरी कसं? निवडणूक आयोगाच्या निकालावरून अनिल देसाईंनी व्यक्त केली चिंता

सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याची आवश्यकता नाही, असा दावा शिंदे गट करत आहे या प्रश्नावर खासदार देसाई म्हणाले, कोणी काय सांगावे किंवा काय पर्याय सुचवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमचे म्हणणे चुकीचे असते तर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारीच आम्हाला उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले असते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आमच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास वेळ दिला आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे जी परस्थिती निर्माण झाली आहे. शिंदे गटाकडून जे काही सुरु आहे ते निसतरणार कसं, अशी चिंता ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सध्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. या सुनावणीबाबत माहिती देताना खासदार देसाई यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीसाठी घातक आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाकडून जे काही सुरु आहे ते निसतरणार कसं असा प्रश्न आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय ठाकरे गटाकडे आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याची आवश्यकता नाही, असा दावा शिंदे गट करत आहे या प्रश्नावर खासदार देसाई म्हणाले, कोणी काय सांगावे किंवा काय पर्याय सुचवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमचे म्हणणे चुकीचे असते तर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारीच आम्हाला उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले असते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आमच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास वेळ दिला आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. गेल्या ८ महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. महाराष्ट्रात भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदेंनी बंड केले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर त्यांनी केलेली नव्या सरकारची स्थापना, १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका (ठाकरे गटाकडून), विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव (शिंदे गटाकडून) यासह आणखी इतर याचिकांवर सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे.

या याचिकांवर सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. या मुद्द्यावर सलग तीन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला. यावर निकाल देताना न्यायालयाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर वर्ग करण्यास नकार दिला. त्यामुळे ही सुनावणी सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुरु आहे.