घरमहाराष्ट्रअनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा

अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. परमबीर यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या आरोपावर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांत चौकशी करून अहवाला सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला. देशमुख यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा देत असल्याची माहिती दिली. पवारांनी होकार दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यावर पवार यांनी होकार दिला. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांना भेटले’, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने परमबीर सिंह यांनी केलेल्या याचिकेसह अन्य याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर निर्णय बुधवारी राखून ठेवला होता. त्यावर सोमवारी न्यायालयाने निकाल दिला. जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलिसांत तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आम्ही या बाबीकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

- Advertisement -

आरोप राज्याच्या गृहमंत्र्यांविरोधात आहेत, त्यामुळे असामान्य स्थिती म्हणून सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले जात आहेत. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय सीबीआयने घ्यावा, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. वनमंत्री संजय राठोड, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता तिसरा कॅबिनेट मंत्री कोण? यावर मंत्रालयात चर्चा सुरू आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रात्री उशीरा अनिल देशमुखांचा राजीनामा मंजूर केला आहे.

नैतिकतेमुळे राजीनामा-देशमुख
‘मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याकडे अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल केलेल्या याचिकेमध्ये सोमवार 5 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्या अनुषंगाने मी, मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वतःहून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. सबब मला मंत्री (गृह) या पदावरून कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती,’ असे अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.

- Advertisement -

अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात?
अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची सीबीआयमार्फत प्राथमिक चौकशी करण्यात यावी, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि आता ते न्यायालयीन लढाईसाठी सज्ज झाल्याचे सांगण्यात येते. सोमवारी ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला देशमुख सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शक्यताअसून सीबीआय चौकशीचा आदेश रद्द करावा, अशी विनंती ते याचिकेत करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांची देशमुख यांनी भेट घेतली. त्यानंतर माजी गृहमंत्री देशमुख यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची भेट घेणार आहेत.

राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता-फडणवीस
गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा अपेक्षितच होता. खरेतर तर तो आधीच व्हायला हवा होता. देशमुखांकडे राजीनामा देण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. हा राजीनामा झाला असला तरी अजूनही एका गोष्टीचे कोडे मला पडले आहे. इतक्या भयावह घटना राज्यात घडत आहेत. कधी नव्हे तेवढे आरोप मंत्र्यांवर लागले. मात्र, अजूनही मुख्यमंत्री बोलत नाहीतेय. मुख्यमंत्री शांत आहेत. हे अस्वस्थ करणार आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -