मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामांडळाकडून अवधकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम भविष्य निर्वाह निर्वाह निधी विश्वस्त मंडळाकडे जमा केली नसल्याची बाब आज (12 मार्च) आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केली. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची आणि ग्रॅच्युइटीची रक्कम अदा करणे बाकी असल्याची माहिती सभागृहात दिली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रताप सरनाईक यांना घेरण्याचा प्रयत्न केला. (Anil Parab and Pratap Sarnaik face to face in Maharashtra Legislative Council over ST workers PF issue)
डॉ. परिणय फुके यांच्या प्रश्नावर उत्तर देताना प्रताप सरनाईक म्हणाले की, मध्यंतरी एसटी कामगारांनी संप पुकारला होता, मात्र त्यानंतरही आम्ही कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली आहे. परंतु आमच्याकडे भविष्य निर्वाह निधीसंदर्भात एकही तक्रार आलेली नाही. भविष्यात अशा प्रकारे कुठल्याही निधीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च केली जाणार नाही, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. यावर यावर अनिल परब म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे कुठेही वापरता येत नाहीत. जर वापरले गेले तर हा फौजदारी गुन्हा ठरतो. त्यामुळे ज्यांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे इतरत्र व पगारावर वापरले असतील त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे तत्काळ जमा करण्याची विनंती केली.
हेही वाचा – Electricity Rate : राज्यात वीजेचे दर वाढणार नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिलासा
अनिल परब यांच्या मागणीवर प्रताप सरनाईक एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थिती माहिती सभागृहात दिली. त्यांनी म्हटले की, महामंडळाची 64 कोटी रुपयांची मासिक तूट आहे आणि शासनाकडून आम्हाला 582 कोटी रुपये येणे बाकी आहे. तसेच मानव विकास योजनेचे 268 कोटी रुपये यायचे आहेत. त्यामुळेच सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी मी सर्वांना आश्वस्त करतो की, कर्मचाऱ्यांच्या पीएफवरील व्याजाच्या रक्कमेचे नुकसान झालेले नाही. त्यांचे व्याज जमा केले जात आहे. एकाही कर्मचाऱ्याचे नुकसान होणार नाही. एकाही कर्मचाऱ्याचा भविष्य निर्वाह निधी इतरत्र कुठेही खर्च झालेला नाही, अशी माहिती त्यांनी केली. मात्र प्रताप सरनाईक यांच्या उत्तरावर अनिल परब पुन्हा आक्रमक झाले.
अनिल परब म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या पैशांवर डल्ला मारला जातोय. या लोकांवर कारवाई व्हायला हवी, परंतु या कटात मंत्री सरनाईक सहआरोपी आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा एकही रुपया इतरत्र खर्च केला जाणार नाही. परंतु काही स्थितीत किंवा वेगळ्या वातावरणानुसार राज्य शासनाच्या निधीअभावी काही गोष्टी घडत असतात. मात्र आम्हाला कोणत्याही कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीसंदर्भात एकही तक्रार आलेली नाही. पैसे कामगारांच्या खात्यावर गेले आहेत आणि व्याजही जमा करण्यात आले आहे, असा पुनरुच्चार प्रताप सरनाईक यांनी केला. मात्र प्रताप सरनाईक यांच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत विरोधकांनी सभात्याग केला.