मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 ला गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली. वांद्र्यात त्यांच्या मुलाच्या म्हणजेच माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर झिशान यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात वडील बाबा सिद्दीकी यांची हत्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रकल्पामुळे झाल्याचा दावा केला आहे. ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्याही नावाचा समावेश आहे. याबाबत आता आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. केवळ आरोप करून चालणार नाही तर ते सिद्धही करा, असे आव्हानच परब यांच्याकडून झिशान सिद्दीकींना देण्यात आले आहे. (Anil Parab challenge to Zeeshan Siddiqui as he was accused in Baba Siddiqui murder case)
माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात जबाब नोंदविण्यात आला होता. पोलिसांना दिलेल्या जबाबात झिशान सिद्दीकी यांनी बाबा सिद्दीकींच्या हत्येचा संबंध हा वांद्रेतील पुर्नविकास प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानेच हा प्रकार घडल्याचा दावा केला आहे. तसेच झिशान सिद्दीकींच्या जबाबात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या ज्ञानेश्वर नगर प्रकल्पबाधितांची बैठक घेतल्याचाही उल्लेख आहे. अनिल परब यांनी घेतलेल्या बैठकीत विकासकांनी झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी घर मिळेल असे वचन दिले होते, पण त्यानंतर ते तसे करणार नसल्याचे लक्षात आले, असे झिशानने जबाबात म्हटले आहे.
माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या जबाबावर स्पष्टीकरण देण्यासाठी आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत आमदार परब म्हणाले की, एक गोष्ट नक्की आहे की, हा जो जबाब आहे तो झिशान यांनी 24-10-2024 या तारखेला नोंदवला होता. त्यामध्ये असा उल्लेख आहे की, जी बैठक ज्ञानेश्वर नगरला झाली होती, त्या बैठकीला आम्ही दोघेही आमदार म्हणून हजर होतो. मुळात त्या बैठकीला सर्व पक्षाच्या नेत्यांना बोलविण्यात आले होते. ज्याचे रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर नगरच्या लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही तिथे गेलो होतो. या व्यतिरिक्त माझा कुठेही उल्लेख नाही. पण त्यांनी जो काही जबाब नोंदवला आहे, त्याबाबत पोलिसांनी चौकशी केली असेलच आणि पोलिसांच्या चौकशीअंती जे काही येते, ते चार्जशीटमध्ये किंवा आरोपपत्रात दाखल होते, असे परब यांच्याकडून सांगण्यात आले.
तसेच, आरोपपत्रात पोलिसांनी त्यांना जे काही तपासामध्ये आढळून आले आहे, ते लिहिलेले असेल. पण त्यातूनही झिशान सिद्दीकींचे समाधान झाले नसेल किंवा त्याचा काही वेगळा अँगल असेल तर त्यांनी त्याबाबत पुन्हा सरकारकडे किंवा पोलिसांकडे तक्रार करावी. कारण सरकार त्यांचे आहे, पोलिसही त्यांचे आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणते वेगळे सत्य लपलेले असेल जे झिशान यांना माहीत असेल, त्याच्या वडिलांना कोणत्या गँगस्टरचे फोन येत होते, अशा बातम्या सतत येत होत्या. छोट्या शकिलने बाबा सिद्दीकींना धमकी दिल्याची बातमी येत होती. त्यामुळे त्याबाबतची सुद्धा चौकशी व्हावी. कारण या प्रकरणाशी संबंधित इतर कोणता अँगल लपविण्यासाठी ते जर का आरोप करत असतील तर त्यांनी ते सिद्धही करावे, असे आव्हानच यावेळी आमदार परब यांनी दिले आहे.