Video : कोर्टात वाद, बाहेर मात्र मित्राला साद, अनिल परब आणि शेवाळेंमध्ये रंगल्या गप्पा

२३ फेब्रुवारीला न्यायालयाबाहेर दोन विरोधी गटाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये गप्पा रंगल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यातील एक नेते आहेत ठाकरे गटाचे अनिल परब आणि शिंदे गटातील नेते राहुल शेवाळे.

सर्वोच्च न्यायालयात सध्या सत्तासंघर्षावरून सुनावणी सुरू आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या प्रतिष्ठेलाच आव्हान देणारा हा खटला असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून न्यायालयात जोरदार युक्तीवाद केला जात आहे. याचदरम्यान  कोर्टाच्या आवारात काल २३ फेब्रुवारीला न्यायालयाबाहेर याच दोन विरोधी गटाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये गप्पा रंगल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यातील एक नेते आहेत ठाकरे गटाचे अनिल परब आणि शिंदे गटातील नेते राहुल शेवाळे. या दोघांची ही गप्पांची मैफील बघून सगळ्यांनाच धक्का बसला. यामुळे मिडियाने दोघांना गराडा घालत त्यांचे फोटोशूट करण्यास सुरुवात केली.

त्यावर परब यांनी पाहिजे असल्यास अगोदरचेही फोटो पाठवतो. तसेच आमचे फोटो कधीही घेऊ शकता. आमचे भरपूर जुने फोटो आहेत, असे राहुल शेवाळे यांनीही हसत पत्रकारांना सांगितले. त्यानंतर दोघा नेत्यांनी सोबत फोटोसेशनही केले. आमचे एकत्र फोटो असले तरी आम्हाला कोणीही काही विचारू शकत नाही, असे विधान यावेळी अनिल परब यांनी केले.