घरमहाराष्ट्रदोन दिवसांत लालपरी पूर्वपदावर परिवहन मंत्री अनिल परब यांचा दावा

दोन दिवसांत लालपरी पूर्वपदावर परिवहन मंत्री अनिल परब यांचा दावा

Subscribe

सध्याच्या घडीला राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडाळाची सेवा 90 टक्के सुरू झाली आहे. संपावर गेलेलेे बहुतांश एसटी कर्मचारी कामावर परतले असून पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व एसटी कर्मचारी कामावर परततील. यामुळे पुढील दोन दिवसांत लालपरी पूर्वपदावर येईल, असा दावा परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी केला.

एका कार्यक्रमात बोलताना अनिल परब यांनी सांगितले की, एसटी कर्मचार्‍यांची संख्या 82 हजारांच्या आसपास आहे. त्यापैकी परिवहनचे 70 हजार कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. राज्यातील काही आगारांमधील 100 टक्के कर्मचारी परतले आहेत. संपकाळात ज्या कर्मचार्‍यांवर निलंबनाची, बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती, त्यांना देखील आम्ही कामावर घेतले आहे. मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या हमीपत्रानुसार आम्ही 22 एप्रिलपर्यंत परतणार्‍या कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत सामावून घेऊ. त्यामुळे पुढील दोन ते दिवसांत 100 टक्के कर्मचारी कामावर आल्यास दोन दिवसांत एसटी पूर्वपदावर येईल, असे अनिल परब म्हणाले.

- Advertisement -

परिवहन मंत्र्यांनी मागितली माफी
संपाच्या काळात राज्यातील जनता आणि एसटीचे खूप नुकसान झाले. एसटी कर्मचार्‍यांच्या भावनांशी खेळण्यात आले. त्यांचे पैसे लुबाडून स्वत:ची घरे भरण्यात आली. या लढाईत कामगारांच्या पदरी काही पडले नाही. उलट राज्य सरकारने इतर राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचार्‍यांना चांगला पगार दिला. राज्यातील जनतेला मागील 5 महिन्यांत जो त्रास झाला, त्याबद्दल एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी माफी मागतो. गरिबांची जीवनवाहिनी सुरू राहिली पाहिजे, असे माझे मत असल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केलेे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -