बीड : बीडमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या राज्यात अनेक हालचाली पाहायला मिळत आहेत. मंगळवारी (4 फेब्रुवारी) सकाळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देत अंजली बदनामीया म्हणत त्यांची खिल्ली उडवली. तसेच, अंजली दमानिया यांना परत राजकारणात यायचं असेल त्यामुळे न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांच्याकडून टीका करण्यात आली. यावर पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतच टीका केली. (Anjali Damania on criticism of Minister Dhananjay Munde)
मंगळवारी दुपारी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर अंजली दमानिया यांनी त्यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. “मंत्री धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत मला वाटेल ती नावे ठ्जेवली. दमानिया नाही तर बदनामीया असे नाव ठेवले, पण पुराविया ठेवले असते तर बरे झाले असते. बदनाम लोकांचे मी पुरावे देते, त्यामुळे माझे कोणतेही नाव ठेवलेले मला चालेल. मी एक एक पुरावे काढून तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. तुम्ही जेवढा वेळ कराड सोबत होता, त्यापेक्षा एक क्षण तुम्ही मंत्री म्हणून बसला असता तर तुमच्यावर पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती,” असे म्हणत त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.
“मला अधिकार होता असे मुंडे म्हणतात. 12 एप्रिल 2018चा जीआर आहे. नवीन वस्तूंचा समावेश करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. वस्तू वगळण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना दिलेला नाही. धनंजय मुंडे यांनी डोळे उघडून बघितले पाहिजे. डीबीटीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्यासाठी छाननी समिती स्थापन करण्यात आली होती. म्हणजे ही समिती जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत कोणतीही वस्तू डीबीटीच्या बाहेर वगळण्याचा कोणालाही अधिकार नाही. कृषीमंत्र्यांनासुद्धा नसून मुख्यमंत्र्यांना तसेच अजित पवार यांनाही नाही. मुख्य सचिवांच्या नेतृत्वात ही समिती होती.” असे अंजली दमानिया पत्रकार परिषदेत म्हणाल्या.
“एमएआयडीसी किंवा महाबीज स्वत: उत्पादन करते. अशाच वस्तू डीबीटीच्या बाहेर राहणार आहे. बाकी उत्पादन न केलेल्या प्रत्येक वस्तू डीबीटीअंतर्गत द्यायच्या असतील तर त्याचे पैसे हस्तांतरण करण्यात यावे अशा सूचना आहेत. मंत्री म्हणून वेळ दिला असता तर तुम्हाला हे कळले असते. बीडमध्ये जाऊन दादागिरी करायची, दमदाटी करायची. मामींची जमीनही बळकवायचे काम केले आहे,” असा हल्लाबोल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.