बीड – जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींशी असलेल्या संबंधामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते आणि मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. मंत्री मुंडे यांच्यावर रोज नित्यनवे आरोप आहेत. परळीतील पीकविमा घोटाळा, शेतकऱ्यांना हार्व्हेस्टर देण्यासाठीचा आर्थिक घोटाळा, परळी औष्णिक उर्जा राख घोटाळा आणि जिल्ह्यातील पवनचक्की मालकांकडून खंडणी मागितल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर होत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री धनंजय मुंडे भगवान गडावर मुक्कामी होते. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे गुन्हेगार नसल्याचे म्हणत त्यांना क्लीनचिट देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंची दुसरी बाजू माहित नसेल तर त्यांना सर्व पुरावे पाठवणार असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीडमध्ये मुक्काम करुन संपूर्ण प्रकरण समजून घेऊन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हत्याकांडाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध उघड केले आहेत. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना क्लीनचिट देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावर अंजली दमानिया यांनी रोष व्यक्त केला आहे.
धनंजय मुंडे याआधी गडावर मुक्कामी केव्हा होते? – अंजली दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या दमानिया म्हणाल्या, “भगवानगड पवित्र स्थान आहे. अशा ठिकाणी पत्रकार परिषद घेणेच मला चुकीचे वाटते. भगवान गडावरुन धनंजय मुंडेंची पाठराखण करणे चुकीचे वाटते.” अंजली दमानिया म्हणाल्या की नामदेव शास्त्री अध्यात्मिक आहेत. त्यांना माझ्यापेक्षा जास्त समजते. धनंजय मुंडेबद्दलची एकच बाजू कदाचित त्यांना माहित असेल असे सांगत दमानिया म्हणाल्या की, “नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंची दुसरी बाजू कदाचित माहित नसावी. मंदिरात जाताना कोणतीही व्यक्ती पवित्र होऊन जात असते. मात्र धनंजय मुंडेंची दुसरी बाजू देखील आहे. तुमच्यापर्यंत याची माहिती नसेल तर मी सर्व कागदपत्र तुमच्यापर्यंत पोहचवते. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध काय आहेत. खंडणी प्रकरणात त्यांचा संबंध काय आहे, याचे पुरावे मी तुमच्यापर्यंत पोहचवे.”
अंजली दमानिया म्हणाल्या की, मी धनंजय मुंडेंबद्दल बोलले ते तथ्यच सांगितले आहे. फक्त एक, दोन व्यक्ती त्यांच्याबद्दल बोलत नाही. आम्ही मीठ मिरची लावून काहीही सांगितलेले नाही. आम्हाला आपेक्षा आहे की, गडावरुन राजकारण व्हायला नको होते. धनंजय मुंडेंची पाठराखण करणं चुकीचे आहे. शास्त्रींना कदाचित माहित नसेल की त्यांच्याकडे एवढा अफाट पैसा कुठून आला. मंदिरात आलेली व्यक्ती वेगळी असते. प्रेस घेऊन त्यांची मीडिया ट्रायल होते हे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही गु्न्हेगार हा गु्न्हेगार असतो एवढेच सांगत आहोत. त्याला जात, जमात कोहीही नसते. असेही दमानिया म्हणाल्या.
अंजली दमानिया म्हणाल्या की, नामदेव शास्त्रींपर्यंत धनंजय मुंडेंच्या गु्न्हेगारीची कागदपत्र पोहचवते, ते पाहिल्यानंतर त्यांची भूमिका बदलले, असेही दमानिया म्हणाल्या. धनंजय मुंडे आता अडचणीत आले आहेत. तेव्हा ते भगवान गडावर गेले का, असा सवाल करत अंजली दमानिया म्हणाल्या की, याआधी धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर मुक्काम कधी केला होता, तेही सांगावे.
काय म्हणाले होते नामदवे शास्त्री ?
धनंजय मुंडे यांनी गुरुवारी भगवान गडावर मुक्काम केला. त्यानंतर शुक्रवारी पत्रकार परिषद घेत नामदेव शास्त्री म्हणाले की, धनंजय मुंडे हा राजकीय घराण्यात जन्माला आलेला मुलगा आहे. विविध पक्षाचे नेते त्याचे बालमित्र आहेत. तो गुन्हेगार नाही. त्याला गुन्हेगार का ठरवत आहेत, हे समजत नाही, असाही सवाल त्यांनी केला. भगवान गड हा भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही, असे सांगत नामदेव शास्त्री म्हणाले की, “गेले 53 दिवस त्यांची मीडिया ट्रायल सुरु आहे.”
हेही वाचा : Namdev Shastri : मस्साजोगमधील आरोपींची मानसिकाताही समजून घेतली पाहिजे – नामदेव शास्त्री