मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संशयित वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आला आहे. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत आहे. अशातच धनंजय मुंडेंबाबत तुमच्याकडे कुठले पुरावे आहेत? असा प्रश्न ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. त्यांच्या आरोपाला आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फोटोच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. (Anjali Damania shared a photo of Laxman Hake and Valmik Karad together)
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकल ओबीसी समाजाच्या वतीनं संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन आंदोलन पार पडलं. या आंदोलनात बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, तुम्ही आमदार, खासदार झाल्यावर सगळ्यांचे लोकप्रतिनिधी असता. मग, तुम्ही जातीचे मोर्चे कसे काय काढता? संतोष देशमुखांच्या श्रद्धांजली सभेत राजकीय नेत्यांना लक्ष्य केले जाते. संतोष देशमुखांच्या हत्येमागील गांभीर्य सुरेश धस आणि मनोज जरांगे-पाटलांनी कमी केले आहे. उठले की सुटले की फिल्मी डायलॉग मारले जातात. सुरेश धस सातत्यानं टीव्हीवर दिसतात, असा हल्लाबोल हाके यांनी केला.
हेही वाचा – Rohit Pawar : शरद पवारांच्या खासदारांना ऑफर? रोहित पवार म्हणाले, अजित पवार पक्षाचे प्रमुख असले तरी…
एक व्यक्तीने मला हा फोटो पाठवला pic.twitter.com/TfhLJ0Yq78
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 8, 2025
लक्ष्मण हाके म्हणाले की, मी संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन करत नाही. पण, धनंजय मुंडेंबाबत तुमच्याकडे कुठले पुरावे आहेत? शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, सुरेश धस यांच्यासोबत वाल्मीक कराडचे फोटो आहेत. तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी वाल्मीक कराड चालतो आणि आता तुम्हाला धनंजय मुंडे दिसतात का? मला वाटते, मुंडे आणि कराडला अडकवलं जात आहे. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, पण सध्या सुरू असलेल्या राजकारणामुळे ओबीसींच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या गोष्टी होत आहेत, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
हेही वाचा – Ladki Bahin Yojna : मोफत रेवडी वाटप करण्यासाठी राज्यांकडे पैसे पण…; सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
लक्ष्मण हाके यांच्या आरोपावर आता अंजली दमानिया यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. एका व्यक्तीने हा फोटो पाठवल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. या फोटोमध्ये वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके हे एकत्र जेवण करताना दिसत आहेत. हा फोटो नेमका कुठला आणि कधीचा, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या फोटोवर आता चर्चा होताना दिसत आहे.