अण्णा हजारे रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल; प्रकृती ठणठणीत

नियमित तपासणीअंतर्गत आज दिवसभर विविध तपासण्या, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल

anna hazare speaks on sarpanch election process

पारनेर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गुरुवारी (दि.२५) नियमित आरोग्य तपासणीसाठी पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. अण्णांची प्रकृती ठणठणीत असून, काळजीचे काहीही कारण नसल्याची माहिती राळेगणसिध्दीतील कार्यालयाकडून देण्यात आली.

अण्णा हजारे बुधवारी (दि.२४) दिवसभर कार्यकर्त्यांच्या शिबिरात होते. मात्र, गेली दीड वर्षे कोरोना परिस्थितीमुळे अण्णांची नियमित आरोग्य तपासणी झालेली नव्हती. बुधवारी डॉ. धनंजय पोटे व डॉ. हेमंत पालवे यांनी प्राथमिक तपासण्या केल्यानंतर वयानुरुप पुढील तपासण्या रुबी हॉस्पिटलला करण्याची सूचना केली होती. त्यानुसार अण्णांना गुरुवारी सकाळी पुण्यातील रुबी हॉस्पिटलला नेण्यात आले. या ठिकाणी करण्यात आलेल्या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे डॉ. ग्रँट यांनी सांगितले. अण्णांना कोणताही त्रास नसला तरी वय लक्षात घेता डॉक्टरांनी त्यांची अँजिओग्राफी केली. त्याचे रिपोर्टही नॉर्मल आले. विश्रांतीसाठी आज रात्री अण्णा रुग्णालयातच थांबतील. सकाळी उर्वरीत तपासण्या करून अण्णा राळेगणला परततील. अण्णांच्या प्रकृतीविषयी कार्यकर्त्यांनी काळजी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.