तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिलेली नाही, अण्णा हजारेंचे हताश उद्गार

वाईन विक्रीचा निर्णय जनतेला विचारात घेऊन करण्यात येईल, असे आश्वासन सरकारने दिल्यामुळे कार्यकर्ते व ग्रामसभा यांच्या आग्रहानुसार १४ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होणारे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

anna hazare cancel fast against wine selling in supermarket

तुम्ही जनतेचे सेवक आहात. मालक नाही. त्यामुळे तुम्ही जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही मनमानी कशी करू शकता? वाईन ही आपली संस्कृती नाही. आपल्या राज्यात दारुची दुकाने कमी आहेत का? तरीही किराणा आणि सुपर मार्केटमध्ये वाईन का ठेवता? तुम्हाला तरुण पिढीला व्यसनाधीन बनवायचे आहे का? तुमच्या या निर्णयाने मी दु:खी झालो आहे. त्यामुळे मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिलेली नाही, असे हताश उद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी काढले. राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांनी 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाची हाक दिली होती. मात्र, अण्णांनी वयाचा विचार करून उपोषण करू नये, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. ग्रामसभेचा हा ठराव मान्य करत अण्णांनी उपोषण पुढे ढकलले आहे.

अण्णा हजारे यांनी आमरण उपोषणाची हाक दिल्यावर त्यांची मनधरणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी अण्णांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. त्यांच्याशी तब्बल 3 तास चर्चा करून वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत राज्यातून हरकती मागवल्या जातील. या हरकतींचा सूर लक्षात घेऊन निर्णयाची अंमलबजावणी करायची की नाही यावर निर्णय घेतला जाईल, असे नायर यांनी अण्णांना सांगितले. त्यावर सरकारने हरकती व सूचना लक्षात न घेता घुमजाव केल्यास मी आणखी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी अण्णा हजारेंनी दिला.

२७ जानेवारी २०२२ रोजी राज्य मंत्रिमंडळाने सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीसंबंधी निर्णय घेतला. हा निर्णय समाज, तरुण वर्ग आणि संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने घातक असल्याने ३१ जानेवारी रोजी पत्रकार परिषद व प्रेसनोटद्वारे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या माध्यमातून या निर्णयाला विरोध करण्यात आला. मंत्रिमंडळाने जनतेला न विचारता निर्णय घेतल्यामुळे अण्णा हजारे यांनी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वाईन विक्रीच्या नवीन धोरणाला विरोध केला. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एक पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला. दोन्ही पत्रांना सरकारकडून उत्तर न आल्याने ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांना तिसरे पत्र पाठवले. या पत्राद्वारे १४ फेब्रुवारी २०२२ पासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.

उपोषणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांकडून पाठिंबा मिळू लागला. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदने पाठवली. तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाची तयारी सुरू केली. विविध जैन संघटना, काही मुस्लीम संघटना यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. नगरसह काही ठिकाणी वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांनीही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे जाहीर केले. त्यानंतर सरकारने या मुद्यावर चर्चा सुरू केली.चर्चेवर आमचा विश्वास आहे. लोकशाहीत चर्चेतून प्रश्न मार्गी लागू शकतात. त्यानुसार १० फेब्रुवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त यतीन सावंत व इतर वरिष्ठ अधिकारी चर्चेसाठी राळेगणला आले. यावेळी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन चर्चा केली. १२ तारखेला नाशिक विभागीय पोलीस आयुक्त बी. जी. शेखर यांनीही येऊन चर्चा केली.

चर्चेअंती किराणा दुकानात दारूची विक्री करण्यात येणार नाही. वाईन विक्रीच्या नवीन धोरणाचा निर्णय जनतेला विचारून घेण्यात येईल. वाईन विक्रीच्या प्रस्तावित धोरणाच्या निर्णयाला माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी देऊन त्यावर जनतेच्या सूचना व हरकती मागविण्यात येतील. जनतेच्या सूचना व हरकती मागविण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. नागरिकांच्या सूचना व हरकती आल्यानंतर सरकारकडून त्या विचारात घेऊन यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे लेखी पत्र राज्य सरकारतर्फे प्रधान सचिव यांनी दिले. व्यसनाधीनतेस प्रोत्साहन देणार्‍या कोणत्याही धोरणास जन आंदोलनाचा विरोध कायम राहील. वाईन विक्रीचा निर्णय जनतेला विचारात घेऊन करण्यात येईल, असे आश्वासन सरकारने दिल्यामुळे कार्यकर्ते व ग्रामसभा यांच्या आग्रहानुसार १४ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होणारे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकार 2001 पासून प्रयत्नशील

हा निर्णय आज झालेला नसून 2001 पासून या निर्णयाबाबत राज्य सरकार प्रयत्नशील होते, असे अण्णांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाईन संस्कृती आहे? ज्ञानेश्वर, तुकारामांच्या राज्यात वाईन संस्कृती आहे? ही संस्कृती जतन करण्यासाठी कीर्तनकार किर्तन करतात? महाराष्ट्रात दारू कमी आहे का? सर्व लोकांना व्यसनाधीन करायचे आहे का? युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. युवक व्यसनाधीन झाले तर काय होणार?, असा सवाल अण्णा हजारे यांनी केला.