दारुल उलुम देवबंदच्या ‘त्या’ फतव्या विरोधात ‘अंनिस’ आक्रमक

नाशिक : अनेक धर्माचे व जातीचे अन्यायकारक फतवे नेहमीच निघत असतात. त्यात समाजबांधवांना बहिष्कृत करण्यात येत असते. नुकताच असाच एक अन्यायकारक फतवा उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील इस्लामिक दारुल उलुम देवबंदने काढला आहे. धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशांतील विद्यार्थ्यांसाठी हा फतवा आहे. जर व्यक्ती आपली दाढी कापून मदरशात आला तर त्याला बहिष्कृत करण्यात येईल.असा तो फतवा आहे. एवढेच नाही तर अशा विद्यार्थ्यांना धार्मिक शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळणार नाही,असेही त्यात म्हटले आहे. देशभरात या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.

असे फतवे देशभरातील अनेक भागात लागु होण्याची शक्यता असते. महाराष्ट्रात हा फतवा लागू झाल्यास जात पंचायत मूठमाती अभियान त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करेल असे या अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी म्हटले आहे.महाराष्ट्रात सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा २०१७ पासुन लागु झालेला आहे. त्यानुसार कोणत्याही धर्मातील व्यक्तींना बहिष्कृत करणे हा गुन्हा ठरत आहे.त्यामुळे आम्ही सर्वच धर्मातील फतव्यांवर लक्ष ठेवून असल्याचे चांदगुडे यांनी म्हटले आहे.

 महाराष्ट्र शासनाने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा महाराष्ट्रात लागु केला आहे. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील राज्य आहे. परंतू असे बहिष्कृत करण्याचे फतवे हे देशभर निघत असल्याने या कायद्याची देशभर लागु होण्याची अवश्यकता आहे. महाराष्ट्राने देशाला अनेक कायदे दिले आहे. तसाच हा पथदर्शक कायदा आहे. : कृष्णा चांदगुडे, कार्यवाह, अंनिस, जातपंचायत मूठमाती अभियान