शिंदे-फडणवीस सरकारवर शिक्कामोर्तब

विश्वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ मतांनी जिंकला

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या बहुमतावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४, तर विरोधात फक्त ९९ मते पडली, तर ३ आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. बहुमत चाचणीच्यावेळी सर्वपक्षीय १६ आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. त्यात काँग्रेसच्या १० सदस्यांचा समावेश आहे. बहुमत सिद्ध होताच सत्ताधारी बाकावरून शिवसेना-भाजप युतीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

रविवारी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान करणारे शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर यांनी आपली भूमिका बदलली. बांगर यांनी सोमवारी शिंदे गटात दाखल होत विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांची संख्या आता ४० झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान केले नाही.

विधानसभा अधिवेशनाच्या आजच्या दुसर्‍या दिवशी शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे’, असा ठराव मांडला. या ठरावाला शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. या प्रस्तावावर राहुल नार्वेकर यांनी मतदान घेतले. प्रत्यक्ष मतदानापूर्वी पाच मिनिटांसाठी घंटा वाजविण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे दरवाजे बंद करून विश्वासदर्शक ठरावावर मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून शिरगणती सुरू झाली. शिंदे गट आणि भाजपसह बहुजन विकास आघाडी, प्रहार जनशक्ती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेकाप, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य शक्ती तसेच बहुतांश अपक्ष आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या १५ आमदारांसह माकप, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, स्वाभिमानीच्या देवेंद्र भूयार आणि अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. समाजवादी पक्षाच्या दोन आणि एमआयएमच्या एका आमदाराने तटस्थ भूमिका घेतली. शेवटी १६४ विरुद्ध ९९ अशा फरकाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला.

दरम्यान, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार हे विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीसोबत नसल्याची चर्चा होती, मात्र काँग्रेस नाराज नसल्याचा खुलासा अशोक चव्हाण यांनी केला. सभागृहात आधी चर्चा होऊन मग मतदान होते, मात्र यावेळी आधी मतदान झाले. आम्ही येईपर्यंत सभागृहाचे दरवाजे बंद झाले होते, असे त्यांनी सांगितले.

विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानावेळी अनुपस्थित काँग्रेस आमदार
अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, कुणाल पाटील, शिरीष चौधरी, झीशान सिद्दिकी, धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, राजू आवळे, मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 3 महत्त्वपूर्ण घोषणा

इंधनावरील व्हॅट कमी करणार-

जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्यावर केंद्रातील मोदी सरकारने मूल्यवर्धित करात कपात केली. त्यानुसार इतर राज्यांनीही धनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर काही राज्यांनी पेट्रोलवरील व्हॅट कमी केला, पण महाराष्ट्राने पाच पैसे देखील कमी केले नाहीत, परंतु आता युतीचे सरकार आल्याने लवकरच कॅबिनेट बैठकीत पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्यासाठी निर्णय घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

हिरकणी गाव वाचवण्यासाठी 21 कोटींचा निधी-
ज्या हिरकणीने रायगड वाचवला आणि इतिहास घडवला. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र व्हावा हाच संकल्प-
बळीराजा हा राज्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. बांधावर सगळेच लोक जाऊन, त्यांची विचारपूस करतात. या शेतकर्‍याच्या जीवनात देखील सुखाचे क्षण यावेत म्हणून त्यासाठी राज्य सरकार एवढे करेन की, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र आम्हाला करायचा आहे. यासाठी विरोधी पक्षांचे सगळ्यांचे योगदान आणि सहकार्य आम्हाला लागेल. सत्ताधारी व विरोधी पक्षाने हातात हात घालून काम करूयात, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.