अनिल परबांविरोधात आणखी एक गुन्हा, किरीट सोमय्या म्हणतात दोन महिन्यांत…

Sai Resort Case | दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात नोव्हेंबरमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला होता. शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला.

shiv sena Anil Parab granted interim bail in Sai Resort case

मुंबई – माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी केला आहे. अनिल परब यांच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, असं किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलं आहे.

समुद्राचा जागेवर भरणी, स्वागत कक्ष बांधणे, सरकारी जागेवर अतिक्रमण करण्यासाठी अनिल परब, सदानंद कदमविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले. गेल्या दोन महिन्यातील हा चौथा गुन्हा असल्याचंही सोमय्या म्हणाले.


दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात नोव्हेंबरमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला होता. शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात फसवणूक करत बनावट कागदपत्रांच्या आधारे एक रिसॉर्ट बांधल्याचा आरोप होत आहे. 2017 मध्ये अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी भूखंड विकत घेतला आणि कोरोनादरम्यान लॉकडाऊनच्या काळात या शेतीच्या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्याचे काम केले.

हेही वाचा दापोली रिसॉर्ट प्रकरण : अनिल परबांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीकडून समन्स

मिळालेल्या माहितीनुसार, जमीन खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी 2019 मध्ये याची नोंदणी झाली आणि त्यानंतर 2020 मध्ये ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर आणि शिवसेनेचे माजी खासदार रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ही जमीन 1.10 कोटींना विकण्यात आली. दरम्यान किरीट सोमय्यांकडून हे रिसॉर्ट पाडण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या मते रिसॉर्टच्या बांधकामातून पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे परब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) 26 मे रोजी अनिल परब यांच्या सात ठिकाणी छापेमारी केली. तसेच त्यांच्या साथीदारांच्या घरांवरही छापे टाकून चौकशी केली. दरम्यान परब यांनी जमीन खरेदीपासून ते बांधकामात अनियमितता केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. मात्र परब यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत सोमय्या यांच्यावर मानहानीचा दावाही दाखल केला आहे.

हेही वाचा अनिल परब यांना साई रिसॉर्टप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर