Eco friendly bappa Competition
घर पालघर आणखी एका गोवरबाधित मुलाचा मृत्यू; आतापर्यंत 11 जणांनी गमावला जीव

आणखी एका गोवरबाधित मुलाचा मृत्यू; आतापर्यंत 11 जणांनी गमावला जीव

Subscribe

मुंबई : मुंबई, ठाणे, नालासोपारा आदी परिसरात ‘गोवर’चा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे. सोमवारी गोवंडी येथील 1 वर्षे 3 महिन्यांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी नालासोपारा येथील एक वर्षीय लहान मुलाचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे गोवरमुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या 11वर गेली आहे. त्यात मुंबईतील 8 तर मुंबईबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे.

तथापि, नालासोपारा येथील लहान मुलाचा मृत्यू हा संशयित असून डेथ कमिटीचा अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. गेल्या दोन – अडीच महिन्यांपासून मुंबईतील भायखळा, वरळी, वडाळा – अँटॉप हिल, धारावी, अंधेरी, कुर्ला, भांडुप, मालाड, चेंबूर, गोवंडी, दहिसर आदी भागात गोवरबाधित रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत.

- Advertisement -

मुंबईत दिवसभरात 170 संशयित रुग्णांची नोंद झाली असून यशस्वी उपचारामुळे बरे झालेल्या 9 रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. सध्या 42 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबई महापालिका आरोग्य खात्याच्या पथकाने गोवरचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत विविध ठिकाणी भेटी देऊन तब्बल 32 लाख 33 हजार 68 घरांचे सर्वेक्षण केले आहे.

गोवर संसर्गावर नियंत्रण मिळविणार – आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत
गोवरच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणांना यश येत आहे. येत्या काही दिवसांतच व्यापक सर्वेक्षण आणि लसीकरणाच्या माध्यमातून गोवर संसर्गावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मंगळवारी दिली. पालकांनी मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

मुंबईत गोवरचे रुग्ण वाढत आहेत. लहान मुलांसह प्रौढ व्यक्तींना गोवरची लागण झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. सावंत यांनी आज गोवर प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कस्तुरबा रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. तिथेही त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करुन सूचना दिल्या.

लसीकरणासाठी दररोज 140 आणि अतिरिक्त 150 लसीकरण सत्र आयोजित केली जात आहेत. लसीकरण करून घेतले जावे यासाठी समुपदेशन केले जात आहे. त्यासाठी समाजातील काही प्रभावी व्यक्तिमत्त्वे, धर्मगुरू यांचे सहकार्य घेतले जात आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार, आरोग्य आयुक्त डॉ तुकाराम मुंढे, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. मीता वशी, डॉ. अरुण गायकवाड आदी उपस्थित होते.

- Advertisment -