घरमहाराष्ट्रकरोनाचा तिसरा पोलीस बळी

करोनाचा तिसरा पोलीस बळी

Subscribe

कुर्ला वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे यांचा करोनामुळे सोमवारी मृत्यू झाला. करोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍या पोलिसांची संख्या आता तीनवर पोहोचली असून या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

शिवाजी नारायण सोनावणे हे ५६ वर्षांचे पोलीस हवालदार कुर्ला वाहतूक विभागात कार्यरत होते. ते २० एप्रिल रोजी घरी असताना त्यांना ताप आला. त्यांचे अंग तापाने फणफणू लागले. त्यामुळे खाजगी डॉक्टरांकडून त्यांच्यावर इलाज करण्यात आले. मात्र तरीही ताप कमी न झाल्याने त्यांच्या मुलाने त्यांना दुसर्‍या दिवशी म्हणजे २१ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास राजावाडी रुग्णालयात नेले.

- Advertisement -

तेथील डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा हॉस्पिटल येथे जाण्यास सांगताच मुलाने कस्तुरबा रुग्णालय गाठले. तेथील डॉक्टरांनी बेड शिल्लक नसल्याचे सांगत त्यांना नायर रुग्णालयात जाण्यास सांगितले. मुलाने विनंती करूनही त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. अखेर मुलाने नायर रुग्णालयाकडे धाव घेतली. नायर रुग्णालयानेही तेच कारण देत केईएमकडे जाण्यास सांगितले.

मुलाने आशेने रात्री ९ च्या सुमारास केईएम रुग्णालय गाठले. मात्र तेथील डॉक्टरांनीही नकार देत कस्तुरबालाच जाण्यास सांगितले. अखेर त्यांच्या मुलाने कुर्ला वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणदिवेकडे व्यथा मांडली. ते देखील नियंत्रण कक्षाद्वारे याबाबत मदत मागत होते. अखेर भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद कांबळेना कॉल करून याबाबत कारवाई करण्यास सांगितले.

- Advertisement -

कांबळेंनी हस्तक्षेप करत केईएम रुग्णालयातील अधिकार्‍यांना त्यांना दाखल करून घेण्यास सांगितले. आणि रात्री १० च्या सुमारास केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र सोमवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूबाबत मुंबई पोलिसांनी ट्विटद्वारे माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -