घरमहाराष्ट्रमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, आणखी एका अधिकाऱ्याकडून...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, आणखी एका अधिकाऱ्याकडून तक्रार

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकणारे मुंबई पोलीस विभागाचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर त्याच्याच खात्यातून एकावर एक लेटरबॉम्ब टाकण्यात येत आहे. दुसऱ्या लेटरीबॉम्बमुळे परमबीर यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. मुंबई पोलीस दलाचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांच्या तक्रारी नंतर अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर भष्ट्राचाराचा आरोप करून मुख्यमंत्री यांच्यासह पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जात त्यांनी परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयाच्या कथित वसुलीचा लेटरबॉम्ब टाकणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध गावदेवी पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी जगताशी थेट संबंध असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी डांगे यांनी मुख्यमंत्री,पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रारअर्ज दाखल केला होता. “गावदेवी पोलीस ठाण्यात असताना माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत, मला न्याय हवा आहे.” असे अनुप डांगे यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. परमबीर सिंग यांच्यावर डांगे यांनी केलेल्या आरोपाची चौकशी स्वतः पोलीस महासंचालक संजय पांडे हे करीत असताना परमबीर सिंग यांच्या विरुद्ध १४ पानाचे पत्र (तक्रार अर्ज) मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

हा अर्ज अकोला पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक भिमराव घाडगे यांनी पाठवला आहे. या अर्जात त्यांनी परमबीर सिंग यांच्या संपत्तीची तसेच त्याची केलेल्या भ्रश्टाचाराची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री , गृहमंत्री , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पोलीस महासंचालक यांना पाठवलेल्या १४ पानाच्या या तक्रार अर्जात परमबीर सिंग यांच्या भ्रश्टाचाराची तसेच त्यांच्या बेनामी संपत्तीची माहिती नमूद केली आहे. परमबीर सिंग हे २०१५ ते २०१८ याकालावधीत ठाणे पोलीस आयुक्त असताना आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मनमानी कारभार करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप घाडगे यांनी पत्रात केला आहे.

पोलीस दलातील बदल्यासाठी सिंग यांनी एजंट नेमले असून असून ठाण्यात असताना परमबीर सिंग यांनी रिव्होलवर परवाना च्या नावाखाली कोट्यवधी रुपये बेकायदेशीर कमवले असल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे. गंभीर गुन्ह्यात समरी करण्यासाठी मोठ्या रकमा उकळल्याचा आरोप देखील घाडगे यांनी केला असून अनेक बांधकाम व्यवसायिकाकडे परमबीर यांनी हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक केली असल्याचा आरोप घाडगे यांनी पत्रात केला आहे. या सारखे अनेक आरोप घाडगे यांनी आपल्या पत्रात केला असून या सर्व प्रकरणाची चौकशी करून परमबीर सिंग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी घाडगे यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या या तक्रार अर्जामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -