घरमहाराष्ट्रभाजपाच्या विद्वेषी राजकारणाला 'मी पण गांधी'ने उत्तर; 2 ऑक्टोबरला काँग्रेसतर्फे मुंबईत पदयात्रा

भाजपाच्या विद्वेषी राजकारणाला ‘मी पण गांधी’ने उत्तर; 2 ऑक्टोबरला काँग्रेसतर्फे मुंबईत पदयात्रा

Subscribe

मुंबई : देशभरात सध्या भाजपा ‘फोडा आणि राज्य करा’ ही इंग्रजांची नीती वापरत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या विद्वेषाच्या घटना घडत आहेत, तो याच कूटनीतीचा परिपाक आहे. या घटनांचा निषेध करतानाच समाजात सद्‍भावनेचा विचार रूजवण्याची गरज आहे. प्रेम, सद्भावना, शांतता हा महात्मा गांधीजींचा विचार समाजमानसात पोहोचण्यासाठी इंडिया आघाडीच्यावतीने येत्या सोमवारी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ‘मी पण गांधी’ हा नारा देत मुंबईत पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज (30 सप्टेंबर) पत्रकार परिषदेत दिली. (Answer to BJPs hateful politics with Me Pan Gandhi On October 2 Congress march in Mumbai)

मुंबईत मराठी माणसांना घर नाकारण्याचा प्रश्न असो किंवा कांदिवलीतील मराठी तरुणांना झालेली मारहाण असो, देशभरात वाढलेल्या विद्वेषी हिंसेच्या घटना असो, या सर्वच घटनांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या विद्वेषाचे राजकारण जबाबदार आहे. या घटनांचा आणि त्यामागे असलेल्या मनोवृत्तीचा निषेध आम्ही सर्वच करतो, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Loksabha Election : दक्षिण मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे गटाची रणनिती; ‘हा’ नेता लढवणार निवडणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जातात तेव्हा तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्यापुढे नतमस्तक होतात. पण देशात त्यांचे अनुयायी महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचे गोडवे गातात. मनोहर कुलकर्णी गांधीजींवर गरळ ओकतो. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि 15 ऑगस्टचा खुलेआम अवमान करतो. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार त्याविरोधात का कारवाई करत नाही? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला.

- Advertisement -

फोडाफोडी करून सत्ता काबीज करायची, हा भाजपाचा अजेंडा आहेच. पण आता मुंबई महापालिकेसारख्या स्वायत्त संस्थांमध्येही कब्जा करण्याचे धोरण भाजपाने अवलंबले आहे. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेत बेकायदा कब्जा करून कार्यालय थाटले. विधानसभेत आम्ही त्याविरोधात आवाज उठवला, मात्र आता रस्त्यावर उतरून याचा विरोध करण्यात येईल, असा इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिला.

हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या ट्वीटमुळे मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा रद्द? उदय सामंत यांनी सांगितलं खरं कारण…

महात्मा गांधी आणि शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त पदयात्रा

गांधी विचार दडपण्याच्या प्रयत्नांना छेद देण्यासाठी महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीतर्फे खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस समितीने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असून आघाडीतील इतर घटक पक्षांची साथ त्यांना लाभली आहे. या पदयात्रेत सर्वांनीच मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आघाडीच्या नेत्यांनी लोकांना केले आहे. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला  समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विद्या चव्हाण आणि मुंबई अध्यक्षा राखी जाधव, आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, महाराष्ट्र डीएमकेचे ए. मीरन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शैलेंद्र कांबळे, शेकापच्या सम्या कोरडे, जदयुचे अध्यक्ष अमित झा, राजदचे मोहम्मद इक्बाल, आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -